Indian Railway: रसगुल्ल्याने वाढवली रेल्वेची डोकेदुखी! अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल; नेमकं काय प्रकरण आहे..?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:36 PM2022-05-25T15:36:27+5:302022-05-25T15:36:43+5:30

Indian Railway: रसगुल्ल्यामुळे डझनभर गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर शेकडो गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

Indian Railway: Rasgulla increases railway's headache! several trains Cancelled, What exactly happened? | Indian Railway: रसगुल्ल्याने वाढवली रेल्वेची डोकेदुखी! अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल; नेमकं काय प्रकरण आहे..?

Indian Railway: रसगुल्ल्याने वाढवली रेल्वेची डोकेदुखी! अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल; नेमकं काय प्रकरण आहे..?

googlenewsNext

Indian Railway: रसगुल्ला हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. साखरेच्या पाकातला रसगुल्ला पाहिला की, आपल्या तोंडाला पाणी सुटतं. पण, हाच गोड रसगुल्ला भारतीय रेल्वेसाठी कडू ठरला आहे. या रसगुल्ल्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर शेकडो गाड्यांचा मार्ग बदलावा लागला. 

नेमकं काय झालं?
कोरोना सुरू झाल्यापासून बिहारच्या लखीसराय तेथील बर्हिया रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबणे बंद झाले आहे. आता स्टेशनवर 10 गाड्या थांबवण्याच्या मागणीसाठी स्थानिकांनी सुमारे 40 तास निदर्शने केली. स्थानिक लोकांनी रेल्वे रुळावर तंबू ठोकल्याने रेल्वेची वाहतूक 40 तास ठप्प झाली. यामुळे हावडा-दिल्ली रेल्वे मार्गावरील डझनभर गाड्या 24 तास रद्द कराव्या लागल्या, तर 100हून अधिक गाड्या वळवाव्या लागल्या. यामुळे रेल्वेची डोकेदुखी वाढलीच, पण हजारो प्रवाशांचेही हाल झाले.

रसगुल्ल्याचा काय संबंध ?
तुम्हाला वाटेल की, या घटनेशी रसगुल्ल्याचा काय संबंध आहे. तर, संबंध असा की, येथील रसगुल्ला देशभरात प्रसिद्ध आहे. हे फार कमी लोकांना माहीत असेल, पण इथल्या मिठाईला देश-विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषत: लग्न किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी पाहुण्यांसाठी हे रसगुल्ले खरेदी करण्यासाठी लोक लांबून बर्हिया येथे जातात. शहरात या व्यवसायाची 200 हून अधिक दुकाने असून दररोज हजारो रसगुल्ले तयार केले जातात.

ट्रेन नसल्यामुळे धंद्यावर परिणाम
कोरोना काळापासून स्टेशनवर गाड्या न थांबल्याने रसगुल्ल्याच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे स्थानकावर सध्या एकही गाडी थांबत नसल्याने स्थानिक नागरिक आणि मिठाईवाले संतप्त झाले आहेत. रसगुल्ला विकणारे व्यापारी रंजन शर्मा यांनी सांगितले की, बरहिया ते पटना ट्रेनचे भाडे 55 रुपये आहे आणि त्यासाठी फक्त दोन तास लागतात. 

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे
मात्र, व्यापाऱ्यांनी रसगुल्ल्यांचा साठा रस्त्याने सार्वजनिक वाहतुकीतून नेल्याने एकूण भाडे 150 रुपये आणि वेळही दुप्पट लागतोय. कॅब किंवा कार बुक करणे आणखी महाग होईल. या निदर्शनादरम्यान, रेल्वेने एका एक्स्प्रेस ट्रेनला थांबा देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सोमवारी संध्याकाळी आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Indian Railway: Rasgulla increases railway's headache! several trains Cancelled, What exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.