या जगात अनेक व्यक्तींना महागड्या वस्तू खरेदी करण्याचा छंद असतो. काही जणांना महागडे पाळीव प्राणी बाळगण्याची हौस असते. बंगळुरूमधील अशाच एका व्यक्ती एक कुत्रा खरेदी केला असून, तो जगातील सर्वात महागडा कुत्रा असल्याचा दावा केला जात आहे. एस. सतीश असं या कुत्रा खरेदी करणाऱ्या व्यक्तीचं नाव असून, ते एक प्रसिद्ध ब्रीडर आहेत. त्यांनी खरेदी केलेल्या वुल्फडॉग प्रजातीमधील या कुत्र्याची किंमत तब्बल ५० कोची रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
हा कुत्रा जंगली लांडगा आणि कोकेशियान शेफर्ड यांच्या मिश्र संकरामधून विकसित करण्यात आलेला आहे. हा जगातील सर्वात महागडा वुल्फडॉग असल्याचं सांगण्यात येत आहे. एस. सतीश यांनी केडाबॉम्ब ओकामी नावाच्या या दुर्मीण वुल्फडॉगच्या खरेदीवर सुमारे ५० कोटी रुपये खर्च केले आहेत. सतीश यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये एका ब्रोकरच्या माध्यमातून या दुर्मीळ कुत्र्याची खरेदी केली होती. जगातील सर्वात दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या या कुत्र्याचं वय केवळ ८ महिने एवडंच आहे. त्याचं वजन ७५ किलोग्रॅम आणि लांबी ३० इंच आहे.
या कुत्र्याबाबत अधिक माहिती देताना सतीश यांनी सांगितले की, हा कुत्रा एका अत्यंत दुर्मीळ प्रजातीमधील असून, तो अगदी लांडग्याप्रमाणे दिसतो. या प्रजातीच्या कुत्र्याची प्रथमच विक्री झाली आहे. हा कुत्रा अमेरिकेत पाळण्यात आला होता. तसेच या पिल्लाला खरेदी करण्यासाठी मला ५० कोटी रुपये खर्च करावे लागले.
दरम्यान, सतीश हे सध्या त्यांच्याकडील दुर्मीळ प्रजातीच्या कुत्र्यांचं प्राणीप्रेमींसमोर प्रदर्शन करून त्यामधून कमाई करतात. आपल्या उत्पन्नाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, मी ३० मिनिटांच्या कार्यक्रमामधून २ लाख ४६ हजार रुपयांपर्यंत तर पाच तासांच्या कार्यक्रमामधून १९ लाख रुपयांपर्यंत कमाई करतो.