पाठवणी झाल्यावर तासाभरात नवरीला घेऊन वरात मागे फिरली; कुटुंबियांची धाकधूक वाढली; पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:10 IST2021-07-21T19:06:35+5:302021-07-21T19:10:07+5:30
पाठवणीनंतर वरात मुलीच्या घरातून निघाली; पण तासाभरानं वरात माघारी परतली

पाठवणी झाल्यावर तासाभरात नवरीला घेऊन वरात मागे फिरली; कुटुंबियांची धाकधूक वाढली; पण...
शिमला: लग्न सोहळा आटोपल्यावर मुलीकडच्यांकडून मुलीला निरोप दिला जातो. त्यानंतर मुलगी वरातीसह सासरी जाण्यास निघते. पण नवऱ्यासह तासाभरापूर्वी कुटुंबियांचा निरोप घेऊन गेलेली मुलगी संपूर्ण वरातीसह परत आली तर..? हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये असा प्रकार घडला आहे. संपूर्ण वरात माघारी आल्यानं कुटुंबाला धक्का बसला. सगळ्यांची धाकधूक वाढली. पण वरात माघारी फिरण्याचं कारण समजताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला. सध्या या घटनेची सोशल मीडियात खूप चर्चा आहे.
मंडी जिल्ह्यातल्या रोपा गावात एक विवाह सोहळा संपन्न झाला. साग्रसंगीत लग्न झाल्यावर सगळे रिती रिवाज पूर्ण करून नवदाम्पत्याची पाठवणी करण्यात आली. संध्याकाळ झाली असल्यानं लग्नाला आलेल्या पाहुण्यांनी घरातल्या सामानाची आवराआवर सुरू केली. वरात गावातून निघून जवळपास तास उलटला होता. तितक्यात संपूर्ण वरात गावी परत आली. वरात माघारी फिरल्यानं मुलीच्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यानंतर वरातीतल्या मंडळींनी रस्त्यात घडलेला संपूर्ण प्रकार मुलीकडच्यांना सांगितला आणि त्यांच्या जीवात जीव आला.
नवरा नवरीला आणि वरातीला घेऊन त्याच्या घरी परतत असताना बल्ह भागात भूस्खलन झालं. त्यामुळे संपूर्ण रस्ता बंद झाला. मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं रस्ता सुरू करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे वाहतूककोंडी झाली. त्यामुळे वरातीतल्या मंडळींनी मुलीच्या घरी परतण्याचं ठरवलं. वरात अचानक माघारी आल्यानं मुलीकडच्यांना त्यांची व्यवस्था कशी करायची असा प्रश्न पडला. मात्र ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले. त्यांना संपूर्ण वऱ्हाडाची उत्तम व्यवस्था केली.