भिवंडीचा गोविंदा ५ वर्षांपासून कॉटवर
By Admin | Updated: August 18, 2014 04:39 IST2014-08-18T04:06:52+5:302014-08-18T04:39:50+5:30
सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या दहीहंडीला थरांच्या बंधनातून मुक्त केले असल्याने यंदाही उंच थर चढतील व दोरखंडाला लोंबकळत असलेल्या दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी स्पर्धा रंगतील

भिवंडीचा गोविंदा ५ वर्षांपासून कॉटवर
भिवंडी : सर्वोच्च न्यायालयाने यंदाच्या दहीहंडीला थरांच्या बंधनातून मुक्त केले असल्याने यंदाही उंच थर चढतील व दोरखंडाला लोंबकळत असलेल्या दहीहंडीला गवसणी घालण्यासाठी स्पर्धा रंगतील. पण दहीहंडीचा दोरच तुटला तर... असाच दोर तुटून पाच वर्षांपूर्वी भिवंडीचा नागेश भोईर हा गोविंदा जायबंदी झाला. आजही तो आपल्या घरातच आयुष्याचा दोर तुटल्याप्रमाणे जीवन कंठत आहे. ‘हंडी फोडण्यासाठी ढाक्कूमाकूमच्या तालावर थरांवर चढणार असाल तर जरा धीराने घ्या. स्वत:चा जीव सांभाळा. दहीहंडीच्या थरांची स्पर्धा करू नका’, नागेश सर्वांना असे सांगत असतो.
सन २००९ मध्ये ब्राह्मण आळीतील टिळक चौक मित्र मंडळाने बांधलेली दहीहंडी फोडण्यास नागेश प्रभाकर भोईर हा गौरीपाडा येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाबरोबर गेला होता. सहाव्या थरावर चढून नागेशने ती हंडी फोडली. परंतु अचानकपणे हंडीचा दोरखंड तुटून नागेश थेट रस्त्यावर पडला. तेव्हापासून आजतागायत नागेश आपल्या पायांवर उभा राहू शकला नाही. शहरातील खाजगी दवाखान्यापासून ते मुंबईतील केईएम, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही अपंगत्व कायम राहिले.
शहरातील मित्रांप्रमाणे सिद्धिविनायक मंदिर, शिर्डीचे साईबाबा संस्थान, लालबागचा राजा मंडळ या संस्थांकडून आर्थिक मदत झाली. २७ वर्षांच्या नागेशला चार बहिणी आहेत. त्यापैकी एक
बहीण अपंग आहे. नागेशच्या अपंगत्वामुळे आईवडिलांचा आधारच तुटला आहे. (प्रतिनिधी)