पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंटार्टिकाहून आणणार हिमनग
By Admin | Updated: May 7, 2017 00:57 IST2017-05-07T00:57:06+5:302017-05-07T00:57:06+5:30
जगातील १० सर्वांत दुष्काळग्रस्त भागांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) समावेश होतो

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अंटार्टिकाहून आणणार हिमनग
नवी दिल्ली : जगातील १० सर्वांत दुष्काळग्रस्त भागांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा (युएई) समावेश होतो. येथे दिवसेंदिवस पाणीटंचाई उग्र रूप धारण करीत आहे. संशोधकांच्या मते, येत्या २५ वर्षांत येथे एवढा दुष्काळ पडेल की, जीवन कठीण होऊन जाईल. या समस्येवर मात करण्यासाठी अबुधाबीच्या एका कंपनीने अद्वितीय योजना तयार केली आहे. ही कंपनी अंटार्टिका येथून मोठा हिमनग खेचून आणणार आहे. नंतर या हिमनगाला वितळवून त्यातून पिण्याचे पाणी काढले जाईल. ही गोष्ट ऐकताना सोपी वाटत असली तरी ती प्रत्यक्षात प्रचंड कठीण आहे. कारण, युएई आणि अंटार्टिकात दहा हजार कि.मी.चे अंतर आहे. कंपनीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये हा प्रकल्प सुरू होईल. एका हिमनगाला युएईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी जवळपास एक वर्ष लागेल. त्यानंतर या हिमनगाचे तुकडे करून ते छोट्या-छोट्या बॉक्समध्ये भरण्यात येतील. सूर्यप्रकाशाने हे तुकडे वितळल्यानंतर त्याचे पाणी टाकीत गोळा केले जाईल.
नंतर शुद्धीकरण करून ते पिण्यासाठी वापरले जाईल. एका हिमनगातून सरासरी २० अब्ज गॅलन पाणी मिळू शकते. युएईची लोकसंख्या जास्त नाही. त्यामुळे एवढे पाणी युएईच्या रहिवाशांसाठी पुरेसे आहे. हिमनगाला समुद्रकिनाऱ्यावर ठेवल्यामुळे तेथील वातावरणात आर्द्रता निर्माण होऊन पाऊस पडण्याची शक्यता वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.