पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच सरकारविरुद्ध उग्र आंदोलन
By Admin | Updated: August 15, 2014 00:17 IST2014-08-14T23:19:31+5:302014-08-15T00:17:05+5:30
नवाज शरीफ यांनी गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनीच सरकारविरुद्ध उग्र आंदोलन
इस्लामाबाद : पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी हजारो निदर्शक गुरुवारी लाहोरहून राजधानी इस्लामाबादकडे निघाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत राजकीय अस्थिरता आणि लष्कराच्या हस्तक्षेपाची भीती व्यक्त होत आहे. नवाज शरीफ यांनी गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.
१४ आॅगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सरकारविरोधातील दोन गटांना न्यायालयाने शेवटच्या क्षणी निदर्शनांची परवानगी दिली. त्यामुळे उत्साहात या निदर्शकांनी ३७० किलोमीटर लांब प्रवासाचा राजधानीकडे मार्च सुरू केला. राजधानी इस्लामाबादला सध्या लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. महत्त्वाच्या सरकारी ठिकाणांवर लष्कराचा कडक पहारा आहे. निदर्शकांचे नेतृत्व माजी क्रिकेटपटू इमरान खान आणि कॅनडात वास्तव्यास असलेले मौलवी ताहीर उल कादरी हे करीत आहेत.
नवाज शरीफ यांनी लवकरात लवकर निवडणुका जाहीर कराव्यात यासाठी हे दोन गट दबाव आणण्याच्या प्रयत्नात आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत नवाज शरीफ बहुमताने विजयी झाले होते.
‘या मार्चमध्ये तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर तुमच्या मुलांसाठी आणि तुम्हाला जर पाकिस्तानात खरोखरचे स्वातंत्र्य हवे असेल तर सहभागी व्हा,’ असे आवाहन खान यांनी मार्च सुरू होण्यापूर्वी केले. कादरी यांनी इन्कलाब मार्च सुरू होण्यापूर्वी केलेल्या भाषणात पाकिस्तानात लोकशाही स्थापन करण्याचे व पाकिस्तानातून दारिद्रय नष्ट करण्याचे मार्चचे ध्येय असल्याचे जाहीर केले. (वृत्तसंस्था)