८ वर्षाच्या प्रयत्नानंतर शेवटी नशीब फळफळलं; शेतकऱ्याला मिळाला १.५ कोटींचा हिरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 09:08 IST2024-09-14T09:08:01+5:302024-09-14T09:08:20+5:30
दोन मित्रांसोबत शेतात खाण खोदायला सुरुवात केली होती. ८ वर्षांपासून ते हिऱ्याचा शोध घेत होते.

८ वर्षाच्या प्रयत्नानंतर शेवटी नशीब फळफळलं; शेतकऱ्याला मिळाला १.५ कोटींचा हिरा
पन्ना : हिऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पन्ना जिल्ह्यात शेतकऱ्याचे नशीब फळफळले आहे. सरकोहाच्या खाणीतून त्यांना ३२.८० कॅरेटचा जॅम दर्जाचा हिरा सापडला असून त्याची किंमत १.५ कोटी रुपये आहे.
शेतकऱ्याने हिरा सरकारी कार्यालयात जमा केला आहे. पन्नाच्या व्यावसायिक इतिहासातील हा सातवा सर्वात मोठा हिरा आहे. यापूर्वी १९६१ मध्ये ४४.५५ कॅरेटचा हिरा सापडला होता. नारंगीबाग गावातील शेतकरी स्वामीदिन पाल यांनी सरकोहाच्या शेतात सापडलेला हिरा जिल्हा कार्यालयात जमा केला आहे. त्यांनी दोन मित्रांसोबत शेतात खाण खोदायला सुरुवात केली होती. ८ वर्षांपासून ते हिऱ्याचा शोध घेत होते.
पक्के घर बांधणार, मुलांना शिकवणार
३२.८० कॅरेटचा हिरा सापडल्यानंतर स्वामीदिन खूप आनंदित झाले आहेत. हिरा विकल्यानंतर मिळणाऱ्या पैशातून ते पक्के घर बांधणार असून, आपल्या मुलांसाठी जमीन विकत घेणार असून, चांगल्या शिक्षणासाठी त्यांना चांगल्या शाळेत दाखल करणार आहेत.