चेंगिझखानच्या वारसांचे साम्राज्य सापडले
By Admin | Updated: October 27, 2014 01:49 IST2014-10-27T01:38:53+5:302014-10-27T01:49:26+5:30
क्रूरकर्मा म्हणून इतिहासात नोंद असलेल्या चेंगिझखान याचे वारस जिथे राज्य करत होते, त्या ७५० वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष रशियातील व्होल्गा नदीच्या काठी सापडले आहेत.

चेंगिझखानच्या वारसांचे साम्राज्य सापडले
मास्को : क्रूरकर्मा म्हणून इतिहासात नोंद असलेल्या चेंगिझखान याचे वारस जिथे राज्य करत होते, त्या ७५० वर्षांपूर्वीच्या शहराचे अवशेष रशियातील व्होल्गा नदीच्या काठी सापडले आहेत. या परिसरातील उत्खननात दोन ख्रिश्चन धर्मस्थळे सापडली असून, त्यातील एका धर्मस्थळी सुरेख शिल्पे कोरलेली आढळली आहेत. या शहराचे नाव उकेक असून, १२२७ साली चेंगिझखानचा मृत्यू झाल्यानंतर काही वर्षात हे शहर स्थापन करण्यात आले आहे. चेंगिझखानचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या साम्राज्याचे तुकडे झाले. त्याचा नातू बातू खान सत्तेवर आला. त्याने १२०५ ते १२५५ या कालावधीत राज्य केले. हे साम्राज्य गोल्डन होर्ड या नावाने ओळखले जाते. पूर्व युरोप ते मध्य आशियापर्यंत पसरलेल्या या साम्राज्यात चीनला युरोपशी जोडणाऱ्या सिल्क रुटचेही अनेक मार्ग होते.
उकेक शहर बातू खानच्या उन्हाळी निवासस्थानाच्या आजूबाजूच्या परिसरात विस्तारित झाले होते. हे निवासस्थान व्होल्गा नदीवर होते.
बातू खान सोन्याच्या तंबूत बसून राज्य करत असे, त्यामुळे त्याच्या साम्राज्याचे नाव गोल्डन होर्ड असे पडले. उकेक शहरात विविध जातीधर्माचे लोक राहत असत. पुरातत्ववेत्ते व सारातोव वस्तुसंग्रहालयाच्या लोकांनी उकेक शहराचा ख्रिश्चन भाग शोधून काढला आहे. बातू खानच्या साम्राज्यात ख्रिश्चन लोकांचे जीवन कसे होते, त्यावर या उत्खननानतून प्रकाश पडणे शक्य आहे. गोल्डन होर्ड साम्राज्यावर ख्रिश्चनांचे राज्य कधीच नव्हते; पण सर्वच ख्रिश्चन गुलामीचे जीवन जगत नव्हते. कारण त्यावेळी बनविल्या जाणाऱ्या मौल्यवान वस्तूही या उत्खननात आढळल्या आहेत. त्यात एक चिनी काचेची पिन असून, त्यावर डाळिंबाच्या दाण्यांचे डिझाईन आहे.
उकेक शहर फार काळ टिकले नाही. १४ व्या शतकात गोल्डन होर्ड साम्राज्याचा विलय सुरू झाला. १३९५ साली उकेकवर हल्ला झाला. तामरलेन याने हे शहर तसेच गोल्डन होर्ड साम्राज्याचा बराच भाग जिंकून घेतला. यात उकेकची पडझड झाली. (वृत्तसंस्था)