भांडणाला कंटाळून ८२ वर्षाच्या वृद्धाने केली पत्नीची हत्या
By Admin | Updated: May 30, 2014 15:29 IST2014-05-30T13:43:13+5:302014-05-30T15:29:41+5:30
रोजच्या घरगुती भांडणाला कंटाळून एलआयसी आॅफिसर उमाकांत सुळे (८२) या वृद्धाने लाकडी दांडक्याने पत्नी पुष्पा (७८) हिला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ठाण्यात घडली.

भांडणाला कंटाळून ८२ वर्षाच्या वृद्धाने केली पत्नीची हत्या
ठाणे : रोजच्या घरगुती भांडणाला कंटाळून एलआयसी आॅफिसर उमाकांत सुळे (८२) या वृद्धाने लाकडी दांडक्याने पत्नी पुष्पा (७८) हिला बेदम मारहाण करुन तिची हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ठाण्यात घडली. हत्येनंतर त्यांनी झालेला प्रकार फोनवरून कळविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले. सुळे दाम्पत्य घोडबंदर रोड, वाघबीळ परिसरात राहतात. त्यांना एक विवाहित मुलगी आहे. ती उपवन परिसरात राहते. या दाम्पत्यांची सुरुवातीपासून क्षुल्लक कारणावरुन नेहमीच खटके उडत होते. यालाच कंटाळून उमाकांत यांच्या मनात आत्महत्येचा विचारही घोळत होता. मात्र, त्यांची मुलगी त्यांचे नेहमीच मन वळवण्याचा प्रयत्न करीत असे. बुधवारीही सुळे दाम्पत्यामध्ये भांडण झाले. अशाप्रकारे रोजच्या भांडणाला कंटाळून बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास उमाकांत यांनी पत्नी पुष्पा हिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. पुष्पा यांच्या डोक्यात आणि अंगावर त्यांनी १६ ते १७ प्रहार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत सुळे यांना अटक करण्यात आल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळाचे (प्रभारी) उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली. (प्रतिनिधी)