सामान्य पेट्रोल, डिझेलपेक्षा विमानाचे इंधन खूप महाग आहे. तरीही पायलट अनेकदा हे इंधन विमानातून खाली टाकतात. ही प्रक्रिया विमान हवेत असतानाच होते. हे इंधन शेकडो लीटरमध्ये असते. तरीही पायलट याचा निर्णय का घेतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. अनेकदा हवेतून विमान जात असताना आपल्याला ते मागे रेषा सोडत असल्याचे दिसते, यामागे हे एक कारण असू शकते. चला जाणून घेऊया...
जेव्हा एखाद्या विमानाला आपत्कालीन परिस्थितीत खाली उतरायचे असते तेव्हा असे केले जाते. यासाठी विमानाचे वजन कमी करावे लागते. तसेच विमान खाली आदळले तर इंधन कमी असल्यास त्याच्या स्फोटाची तीव्रता कमी होते. म्हणजेच सुरक्षित लँडिंगसाठी हे केले जाते.
जर विमानात जास्त इंधन असेल तर विमान लँड करण्यासाठी एक ठराविक वजन लागते. ते जास्त असेल तर इंधन हवेतच सोडून दिले जाते. ही जागा पायलट ठरवितात. कारण खाली असलेल्या नागरी वस्तीला त्याचा त्रास होऊ नये, याची काळजी घ्यावी लागते. यानुसार हे विमानातील इंधन खाली टाकले जाते.
विमानात तांत्रिक बिघाड आला, खराब हवामान असेल आणि विमानतळावर उतरायचे असेल तर पायलट हा निर्णय घेतात. अनेकदा खराब हवामानामुळे विमानतळावर उतरायला दिले जात नाही, तसेच दुसऱ्या विमानतळाकडे वळविले जाते. तेव्हा हा निर्णय धोकादायकही ठरू शकतो. कारण त्या विमानतळापर्यंत जाण्यासाठी पुरेसे इंधन असावे लागते. तसेच विमान उतरण्यासाठी अनेकदा विमानतळावरच हवेत चकरा मारत रहाव्या लागतात. यासाठई देखील पुरेसे इंधन असावे लागते. यामुळे विमानातून इंधन सोडण्याचा निर्णय हा वाचविणारा देखील ठरतो आणि जिवावर बेतणाराही ठरू शकतो.