एका म्हशीमुळे २ राज्यातील गावांमध्ये संघर्ष; DNA टेस्टची मागणी होताच वाद मिटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:51 IST2025-01-03T17:51:22+5:302025-01-03T17:51:47+5:30
हा संघर्ष पोलिसांपर्यंत पोहचला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एका म्हशीमुळे २ राज्यातील गावांमध्ये संघर्ष; DNA टेस्टची मागणी होताच वाद मिटला
एका म्हशीमुळे २ राज्यांमधील गावांमध्ये मोठा संघर्ष पेटला आहे. कर्नाटकच्या बेल्लारी तालुक्यातील बोम्मनहाल गाव आणि आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील मेदेहाल गावात हा वाद उफाळून आला आहे. या गावातील वाद सोडवण्यासाठी आता म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला परंतु पोलिसांनी DNA चाचणीविनाच गावातील वादावर तोडगा काढला आहे.
म्हशीच्या मुद्द्यावरून सुरू असलेला दोन सीमाभागातील गावांमधील संघर्ष आता शमला आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या जत्रेत ही म्हैस बळी देण्यासाठी ठेवली होती. मात्र या म्हशीवर बोम्मनहाल आणि मेदेहाल या दोन्ही गावांनी त्यांचा दावा सांगितला. हा संघर्ष पोलिसांपर्यंत पोहचला. त्यानंतर वाद मिटवण्यासाठी म्हशीची DNA चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या म्हशीचे सॅम्पल घेऊन तिच्या आईशी सॅम्पल जुळतायेत का हे तपासण्यात येणार होते.
तणाव निवळला कसा?
सीमाभागातील या गावांमध्ये तणाव वाढला असता पोलिसांनी दोन्ही गावातील लोकांसोबत बैठक घेतली. जानेवारी महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या सुक्कमादेवी जत्रेत म्हशीचा बळी देण्यात येणार होता. त्याआधी चारा चरण्यासाठी ही म्हैस माळरानात सोडली होती. परंतु म्हैस चरत चरत आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्ह्यातील मेदेहाल गावात गेली. त्यानंतर बोम्मनहाल गावातील लोक म्हैस परत आणण्यासाठी गेले असता मेदेहाल गावातील लोकांनी ती परत देण्यास नकार दिला. त्यावरून मोठा वाद पेटला.
पोलिसांकडे हा वाद गेला असता बोम्मनहाल गावातील लोकांनी म्हशीची डीएनए चाचणी करण्यास सांगितले. या म्हशीची आई आमच्या गावात असून तिचा मालकी हक्क आमच्याकडे आहे असं गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर आंध्र प्रदेशातील मोका पोलिसांसह दोन्ही गावातील लोकांची बैठक झाली त्यात कर्नाटकच्या गावकऱ्यांना ही म्हैस सोपवण्याचा निर्णय पोलिसांनी दिला. त्यावर दोन्ही राज्यातील गावकऱ्यांची सहमती झाली. हा मुद्दा तातडीने सोडवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले त्यासोबतच वाद घालणाऱ्या गावकऱ्यांना चांगलेच फटकारले.