बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, हिरो अनेक वर्ष गरिबीमध्ये जगत असतो आणि एक दिवस अचानक त्याला समजतं की, तो एका मोठ्या उद्योगपतीचा मुलगा आहे. अशीच एक सत्य घटना समोर आली आहे. चीनमधील एका मुलाची अशीच कहाणी समोर आली आहे. त्याने त्याच्या जीवनातील अनेक वर्ष खऱ्या आई-वडिलांशिवाय घालवले. मात्र, जेव्हा त्याला ते भेटले तेव्हा त्याचं जीवनच बदलून गेलं.
असं म्हणतात ना की, जीवनात कधी कसं वळण येईल काहीच सांगता येत नाही. एका मुलाने त्याचं पूर्ण बालपण एक अनाथ म्हणून घालवलं. कारण तो केवळ ३ महिन्यांचा असताना त्याचं अपहरण झालं होतं. त्याला याची काही कल्पना नव्हती की, तो एका श्रीमंत परिवारातील आहे आणि त्याच्याकडे मोठी संपत्ती आहे. ही भावूक आणि अवाक् करणारी कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
२६ वर्षाच्या शी क्विंशुआई ची कहाणी
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, २६ वर्षीय शी क्विंशुआई ची कहाणी एखाद्या सिनेमाच्या कथेपेक्षा कमी नाही. जेव्हा तो केवळ ३ महिन्यांचा होता, तेव्हा त्याचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी अनेकवर्ष त्याचा शोध घेतला. त्यासाठी कोट्यावधी रूपयेही खर्च केले. पण त्याचा पत्ता लागला नाही. अखेर त्याच्या आई-वडिलांना तो २६ वर्षाचा झाल्यावर सापडला. जेव्हा शी याला समजलं की, तो एका श्रीमंत घरातील मुलगा आहे तर त्याला आश्चर्य वाटलं. गेल्या १ डिसेंबरला त्याने त्याच्या खऱ्या परिवाराची भेट घेतली आणि एका अनाथपासून तो कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा वारस झाला.
त्याने घेतली नाही संपत्ती..
वडिलांनी मुलगा सापडल्याच्या आनंदात मोठी पार्टी दिली आणि त्यासोबतच त्याला काही फ्लॅंट्स, कारची चावी दिली. मात्र, शी क्विंशुआईने या गोष्टी घेण्यास मनाई केली. त्याने केवळ एका फ्लॅटची मागणी केली, ज्यात तो पत्नीसोबत राहू शकेल. शी म्हणाला की, इतका पैसा आणि संपत्ती बघून डोकं फिरू नये म्हणून त्याने असं केलं. अशात त्याने परिवाराकडून तेवढंच मागितलं, जेवढ्याची त्याला गरज आहे. शी एका लाईव्ह स्ट्रीमिंग चॅनलमध्ये नोकरी करतो.