Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 15:15 IST2026-04-08T15:13:36+5:302026-04-08T15:15:09+5:30
Car Gift: कंपनीने त्यांच्या १२ कर्मचाऱ्यांना AUDI A4 सेडान कार गिफ्ट केली आहे. ही एक लग्झरी कार जिच्या फिचर्ससाठी ओळखली जाते. भारतात या कारची एक्स शोरूम किंमत ४७ लाखापासून सुरू होऊन ५६ लाखांपर्यंत जाते.

Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
चेन्नई - कर्मचारी वर्षभर मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काम करतात, जेणेकरून कंपनीने त्यांच्या कामाची दखल घ्यावी, कौतुक करून सन्मानित करावे. जर कर्मचाऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार फळ मिळालं नाही तर अनेकांचा हिरमोड होतो. परंतु चेन्नईतील एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बक्षीस म्हणून दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे. हे सरप्राइज पाहून तुम्हीही म्हणाल बक्षीस असावं तर असं...रेफेक्स ग्रुप नावाच्या कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामाचे कौतुक करत चक्क १२ AUDI कार गिफ्ट म्हणून दिल्यात.
कंपनीने आपल्या १२ मेहनती कर्मचाऱ्यांना लग्झरी AUDI A4 सेडान कार भेट दिली आहे. सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर Unseen Chennai नावाच्या पेजवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात कंपनी कर्मचाऱ्यांना कारची चावी देताना दिसते. हा व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. त्यात लोक कंपनीने दिलेल्या महागड्या गिफ्टमुळे कौतुक करत आहेत. तर काही लोकांनी आपल्यालाही अशीच कंपनी मिळावी अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
मेहनतीचं फळ
चेन्नईमधील या कंपनीच्या ग्रुपने आपल्या कर्मचाऱ्यांना Wheel of Achievement अंतर्गत हे गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला. या कार फक्त बड्या अधिकाऱ्यांसाठी नाहीत तर जे कर्मचारी दीर्घकाळ कंपनीशी जोडलेले आहेत आणि कंपनीच्या यशात त्यांचे योगदान आहे अशांना ही कार देण्यात आली आहे. भारतात अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना ना केवळ बोनस अथवा कॅश देण्याऐवजी महागडे गिफ्ट देत असल्याचं दिसून आले आहे. त्याचा हेतू फक्त चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक नाही तर प्रामाणिक कर्मचाऱ्यांना दीर्घ काळ कंपनीसोबत कायम ठेवण्याचा आहे.
दरम्यान, कंपनीने त्यांच्या १२ कर्मचाऱ्यांना AUDI A4 सेडान कार गिफ्ट केली आहे. ही एक लग्झरी कार जिच्या फिचर्ससाठी ओळखली जाते. भारतात या कारची एक्स शोरूम किंमत ४७ लाखापासून सुरू होऊन ५६ लाखांपर्यंत जाते. या कारमध्ये १०.१ इंचाची टचस्क्रीन, १९ स्पीकर्स असणारे म्युझिक सिस्टम, ३६० डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग असे अनेक फिचर्स आहेत. ही कार अवघ्या ७.१ सेकंदात ० ते १०० किमी वेग पकडू शकते.