प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडनं मागितला चंद्राचा तुकडा; त्यानं थेट १ एकर भूखंडच विकत घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 19:39 IST2020-07-13T19:29:43+5:302020-07-13T19:39:27+5:30
प्रेयसीकडून प्रेरणा घेत थेट चंद्रावरील जमिनीची खरेदी

प्रेमासाठी काय पण! गर्लफ्रेंडनं मागितला चंद्राचा तुकडा; त्यानं थेट १ एकर भूखंडच विकत घेतला
बोधगया: तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणून, असं अनेक प्रियकर त्यांच्या प्रेयसीला म्हणतात. मात्र प्रत्यक्षात हे काही शक्य नसतं. बिहारमधल्या एका तरुणानं मात्र प्रेयसीचा हा हट्ट पूर्ण केला आहे. नीरज कुमार गिरी नावाच्या व्यवसायिकानं त्याच्या प्रेयसीसाठी चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली आहे. यासाठी नीरज यांनी जवळपास दीड वर्ष मेहनत घेतली. चंद्रावर जमीन खरेदी करणारे ते चौथे भारतीय ठरले आहेत.
बिहारच्या बोधगयामध्ये राहणाऱ्या नीरज यांनी चंद्रावर भूखंड खरेदी केला आहे. त्यांच्याआधी आणखी एका व्यवसायिकानं चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. याशिवाय अभिनेता शाहरुख खान आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूचनंदेखील चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. सुशांत सिंह राजपूत मूळचा बिहारचा होता. मात्र त्यानं जमीन खरेदी करताना मुंबईचा पत्ता दिला होता. त्यामुळे चंद्रावर जमीन खरेदी करणारा नीरज बिहारमधील पहिलेच ठरले आहेत.
नीरज यांनी २९ ऑक्टोबर २०१९ मध्ये लूनर सोसायटी इंटरनॅशनलच्या माध्यमातून जमिनीची ऑनलाईन नोंदणी केली. त्यानंतर सोसायटीनं त्यांच्याकडून कागदपत्रं मागवली. नीरज यांनी निश्चित करण्यात आलेली रक्कम खात्यात जमा केली. जमिनीच्या किमतीपेक्षा ती खरेदी करण्याची प्रक्रिया जटिल आणि गुंतागुंतीची असल्याचं नीरज यांनी सांगितलं. २२ जून २०२० रोजी एका ईमेलच्या माध्यमातून त्यांच्या नावावर चंद्रावरील एक एकर जमिनीची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली.