अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या मॅडलिन शहरातील पायलटला लागला भारतातल्या गुडगावमधील भटक्या कुत्र्यांचा लळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 17:08 IST2017-07-25T15:48:01+5:302017-08-21T17:08:40+5:30
कॅलिफोर्नियाच्या मॅडलिन शहरात राहणाऱ्या एका पायलटला भारतीय कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या मॅडलिन शहरातील पायलटला लागला भारतातल्या गुडगावमधील भटक्या कुत्र्यांचा लळा
गुडगाव, दि. 25- लोकांना प्राण्यांवर असलेलं प्रेम कधीही लपत नाही. प्राण्यांची आवड असल्याने लोक अनेकदा कुत्रे, मांजरी पाळताना दिसतात. तसंच प्राण्यांची आवड असणारी काही लोक रस्त्यावर त्यांना आवडणारा कुत्रा किंवा मांजर दिसलं तरी लगेच तिथे खेळायलाही लागतात. पण सगळ्यांनाच पाहिल्यावर आश्चर्य वाटेल अशी एक गोष्ट गुडगावमध्ये घडते आहे. कॅलिफोर्नियाच्या मॅडलिन शहरात राहणाऱ्या एका पायलटला भारतीय कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे. कॅलिफोर्नियातील ही व्यक्ती महिन्यातून अनेक वेळा गुडगावमध्ये येते आणि कामातून वेळ काढून तो वेळ गुडगावमधील भटक्या कुत्र्यांसोबत घालवते. इतकंच नाही, तर तो व्यक्ती गल्लीतील कुत्र्यांना चिकन आणि डॉग फूडही खायला घालतो. तसंच या कुत्र्यांच्या अंगावरचे केस वाढले असतील तर त्या केसांची कटिंगही तो व्यक्ती करतो. याशिवाय कुत्र्यांना आंघोळही घालतो.
कॅलिफोर्नियात राहणारे रॉबर्थो मेरिनो हे इंडिगो एअरलाइन्समध्ये काम करतात. जे जेव्हाही दिल्लीत येतात तेव्हा त्यांना कामानिमित्त गुडगावमध्ये जावं लागतं. गुडगावमध्ये आल्यावर रॉबर्थो यांना रस्त्यावर जिथे कुत्रा दिसेल तिथे ते कुत्र्यांची काळजी घ्यायला सुरू करतात. गुडगावच्या गल्ल्यांमध्ये जाऊन ते कुत्र्यांना फक्त डॉग फूड खायला घालत नाही, तर त्यांच्यासाठी खास चिकनही तयार करतात. याच दरम्यान ते कुत्र्यांची साफसफाईही करतात. भटक्या कुत्र्यांना साफ ठेवण्यासाठी रॉबर्थो यांच्याकडे नेहमी एक बॅग असते त्या बॅगमध्ये कंगवा, कात्री तसंच प्रथोमपचार पेटी असते. रस्त्यावर एखादा कुत्रा आजारी दिसला तर ते त्या कुत्र्याला हॉस्पिटलमध्येही घेऊन जातात. रॉबर्थो मेरिनो त्यांच्या पगारातील काही भाग कुत्र्यांच्या सेवेसाठी खर्च करतात.
लहानपणापासूनच मला कुत्रे पाळायची आवड आहे. आधी माझ्याकडे एक कुत्रा होता पण काही कारणाने त्याचा मृत्यू झाला. कामामध्ये व्यस्त असल्याने कुत्र्याकडे दुर्लक्ष व्हायचं. एकदा बंगळुरूमध्ये असताना भटक्या कुत्र्यांबद्दल कुणीही आपुलकी दाखवत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ती परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्याचा विडा उचलला होता, असं पायलट रॉबर्थो मेरिनो यांनी सांगितलं.
रॉबर्थो मेरिनो यांना स्वतःला नॉनव्हेज जेवण खूप आवडतं. ते जेव्हाही नॉनव्हेज खातात तेव्हा कुत्र्यांसाठी वेगळं नॉनव्हेज जेवण पॅक करून घेतात. कुत्र्यांच्या सेवेतून समाधान मिळत असल्याचं रॉबर्थो मेरिनो सांगतात. महिन्यातून तीन ते चार वेळा त्याचं गुडगावमध्ये येणं होत असतं. गुडगावमध्ये आल्यावर भटक्या कुत्र्यांबरोबर वेळ घालवायची त्यांची हौस ते पूर्ण करतात.