भररस्त्यात हत्या, मदत करण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यास व्यस्त
By Admin | Updated: May 26, 2017 10:00 IST2017-05-26T09:56:23+5:302017-05-26T10:00:00+5:30
वर्दळीच्या या ठिकाणी हत्या करण्यात येत होती तेव्हा उपस्थित लोक मात्र मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते

भररस्त्यात हत्या, मदत करण्याऐवजी लोक व्हिडीओ काढण्यास व्यस्त
>
ऑनलाइन लोकमत
कडापा, दि. 26 - आंध्रप्रदेशातील कडापा जिल्ह्यात एका व्यक्तीची भररस्त्यात हत्या करण्यात आली. वर्दळीच्या या ठिकाणी हत्या करण्यात येत होती तेव्हा उपस्थित लोक मात्र मदत करण्याऐवजी व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते. दुर्देवी गोष्ट म्हणजे मदतीसाठी एकहीजण पुढे आला नाही. मारुती रेड्डी असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अवैध संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
32 वर्षीय मारुती रेड्डी एका प्रकरणी सुनावणीसाठी रिक्षातून न्यायालयात जात होते. न्यायालयाजवळ पोहोचले असता संशयित आरोपी श्रीनिवास रेड्डी आणि रघुनाथ यांनी त्यांनी खेचून रिक्षातून बाहेर काढलं, आणि धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. निर्घूणपणे करण्यात आलेल्या हत्येत आरोपींनी मारुती रेंड्डींचा मृत्यू झाला असतानाही त्यांच्यावर वार केला. एकूण 11 वार त्यांच्यावर करण्यात आले.
हत्या होत असताना रस्त्यावरुन चाललेले लोक काहीच होत नसल्याच्या आविर्भावात चालत होते.एकाही व्यक्तीने पुढे येऊन मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. याव्यतिरिक्त काहीजणांनी मोबाईल काढून व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. काही वेळातच ही घटना आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. घटनेची माहिती मिळताच लोकांनी पोलिसांविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली.
हत्या केल्यानंतर आरोपी सहजपण घटनास्थळावरुन निघून गेले. यानंतर लोकांनी पोलिसांनी फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. आरोपी श्रीनिवास रेड्डी आणि रघुनाथ यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.