उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक अशी अविश्वसनीय घटना समोर आली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा सुरू आहे. विषारी किंग कोब्राने डसल्यामुळे संतापलेल्या एका तरुणाने थेट त्या सापाला पकडले आणि दातांनी त्याचा फणाच चावून टाकला. या घटनेत तरुणाचा जीव वाचला, पण कोब्राचा जागीच मृत्यू झाला. पुनीत नावाच्या या २८ वर्षीय तरुणाने दाखवलेले हे धाडस पाहून गावकरी आणि डॉक्टरही आश्चर्यचकित झाले आहेत.
शेतात घडला थरार!
ही अनोखी आणि थरारक घटना हरदोई जिल्ह्यातील टड़ियावां पोलीस स्टेशन क्षेत्रातील भडायल ग्रामपंचायतीच्या पुष्पताली गावात घडली. या गावचा रहिवासी पुनीत याने दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे आपल्या शेतात गेला होता. त्याचवेळी, अचानक एक किंग कोब्रा त्याच्या पायाला विळखा घालून त्याला डसला.
या जीवघेण्या हल्ल्यामुळे घाबरून जाण्याऐवजी, पुनीतला राग आला. त्याने त्वरित त्या विषारी सापाला हाताने पकडले आणि संतापाच्या भरात त्याचा फणा चावून टाकला. पुनीतच्या या हल्ल्यात कोब्राचा जागीच मृत्यू झाला.
उपचारांनंतर तरुणाची प्रकृती सामान्य
सापाने डसल्यानंतर पुनीतच्या पायात वेदना होऊ लागल्या आणि त्याला चक्कर येऊ लागली. कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पुनीतला हरदोई मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी पुनीतला उपचारांसाठी दाखल करून घेतले आणि रात्रभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. योग्य उपचार मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती सामान्य झाली आणि त्यांना ५ नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
डॉक्टरही झाले हैराण!
या घटनेबाबत बोलताना मेडिकल कॉलेजचे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. शेर सिंह यांनी सांगितले की, "रात्री पुनीत नावाच्या तरुणाला दाखल करण्यात आले होते. त्याला विषारी सापाने डसल्याचे त्याने सांगितले. साप किंग कोब्रा असल्याचे दिसत होते. तरुणाची लक्षणे सामान्य होती, त्यामुळे उपचारानंतर त्याला सुटी देण्यात आली."
डॉ. शेर सिंह यांनी या कृतीला अत्यंत धोकादायक म्हटले आहे. ते म्हणाले, "जर सापाचे विष तरुणाच्या तोंडात गेले असते किंवा सापाने त्याला तोंडातही डसले असते, तर त्याचा जीव वाचवणे अत्यंत कठीण झाले असते." पुनीतच्या या कृत्यामुळे केवळ गावकरीच नाही, तर वैद्यकीय क्षेत्रातील लोकही चकित झाले आहेत. पुनीतचा बदला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.