Missing Girl: व्यक्ती मरणाच्या दारातून परत आल्याच्या अनेक आश्चर्यकारक घटना आपण नेहमीच वाचत असतो. अशीच एक चमत्कारिक घटना समोर आली आहे. ज्यात एका ११ वर्षीय मुलीचा आश्चर्यकारकपणे जीव वाचला किंवा असं म्हणूया की पूर्नजन्मच झाला. इटलीची ही मुलगी भूमध्य सागरात ३ दिवसांपर्यंत अडकली होती आणि तरीही वाचली. कम्पास कलेक्टिव रेस्क्यू टीमनुसार, ४५ लोकांना घेऊन जाणारी त्यांची एक प्रवासी बोट लॅम्पेडुसाच्या तटावर बुडाली होती. ज्यात ही मुलगीही होती. जी आश्चर्यकारकपणे वाचली आहे.
मुलीचा जीव वाचला हे तर चमत्कारिक आहेच, पण सोबतच तिच्यापर्यंत कसं पोहोचण्यात आलं हेही अवाक् करणारं आहे. टिमने सांगितलं की, कम्पास कलेक्टिव द्वारे संचालित बचाव जहाज ट्रोटामर III च्या चालक दलाला मुलीचा एक हलका आवाज ऐकू आला. इंजिनाच्या आणि लाटांच्या मोठ्या आवाजातही चालकाला या मुलीचा आवाज आला हेही अद्भूत आहे. ट्रोटामार III चे कॅप्टन मॅथियास विडेनलुबर्ट यांनी सांगितलं की, "हा अविश्वसनीय योगायोग होता की, आम्हाला इंजिन सुरू असताना सुद्धा मुलीचा आवाज ऐकू आला". त्यानंतर चालकाने लगेच रोमच्या बचाव दलाला सूचना दिली. त्यानंतर मुलीला वाचवण्यात आलं. आता तिच्यावर उपचार सुरू आहेत.
ट्यूब आणि जॅकेट पकडून होती मुलगी
११ वर्षाची मुलगी समुद्री वादळात लाइफ जॅकेट घालून २ ट्यूबला पकडून होती. तिच्याकडे ना प्यायचं पाणी होतं ना काही खायला. त्यामुळे मुलगी फार कमजोर झाली होती. मात्र, ती शुद्धीत होती. तिने आमच्या बोटचा आवाज ऐकला आणि मदतीसाठी आवाज दिला.
मुलगी प्रवास करत होती ती बोट समुद्री वादळात बुडाली होती. त्यानंतर वातावरण खराब असल्याने आणि सततच्या वादळामुळे बचावकार्याला उशीर झाला. अशात सगळ्या प्रवाशांचा मृत्यू झाला. ३ दिवसांनंतर चमत्कारिकपणे मुलगी जिवंत सापडली. मुलीने बचाव पथकाला सांगितलं की, तिने २ दिवसांआधी इतर दोन व्यक्तींना पाण्यात पाहिलं होतं. पण त्यानंतर त्यांना पाहिलं नाही.