‘डीएचओं’च्या कार्यमुक्तीवर जि.प. सदस्य ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 13:07 IST2019-06-21T13:06:20+5:302019-06-21T13:07:46+5:30
पत्रकार परिषदेवरही काही सदस्यांनी घेतला आक्षेप

‘डीएचओं’च्या कार्यमुक्तीवर जि.प. सदस्य ठाम
जळगाव : नियमबाह्य औषध खरेदी, ई-टेंडरींग प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याच्या ठरावावर जि.प. सदस्य ठाम असून त्यांच्या पत्रकार परिषदेवरही काही सदस्यांनी आक्षेप घेतला आहे.
नियमबाह्य औषध खरेदी, ई-टेंडरींगमध्ये घोळ यासह विविध ठपके ठेवत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बबिता कमलापूरकर यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव सोमवारी झालेल्या जि.प.च्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी डॉ. कमलापूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. त्या पाठोपाठ जि.प.च्या आरोग्य विभागातील औषध व इतर खरेदीतील गैरव्यवहार व वैद्यकीय बिलांसाठी होणारी अडवणुकीची तक्रार थेट विधानसभेत पोहचून या विषयी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बुधवारी लक्षवेधी उपस्थित केली होती.
या विषयी गुरुवारी जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील व उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांना विचारले असता, महाजन म्हणाले डॉ. कमलापूरकर यांच्या कार्यमुक्तीवर सदस्य ठाम आहेत. हा सभागृहाचा निर्णय असल्याचे अध्यक्षा उज्ज्वला पाटील म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणी डॉ. कमलापूरकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जि.प. सदस्य जयपाल बोदडे यांनी आक्षेप घेतला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अशी पत्रकार परिषद घेण्याचा अधिकार आहे का, या विषयी बोदडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.