झंवरने मान्य केले चव्हाण यांच्यासोबतचे आर्थिक संबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:21 IST2021-08-21T04:21:35+5:302021-08-21T04:21:35+5:30

जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती शुक्रवारी ...

Zanwar admits financial relationship with Chavan! | झंवरने मान्य केले चव्हाण यांच्यासोबतचे आर्थिक संबंध!

झंवरने मान्य केले चव्हाण यांच्यासोबतचे आर्थिक संबंध!

जळगाव : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या रिमांड रिपोर्टमधून समोर आली आहे. दुसरीकडे सुनील झंवर याला २३ ऑगस्टपर्यंत वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, झंवरला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशकात १० ऑगस्ट रोजी सापळा रचून अटक केली होती. कोठडीत असूनदेखील झंवरने पोलिसांना तपासात अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत, तर काही गोष्टी नाकारल्या आहेत. दरम्यान, झंवर यांच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या फॉरेन्सिक ऑडिटदरम्यान त्याचे राजकीय व इतर व्यक्तींशी आर्थिक लागेबांधे असल्याचे पुरावे पोलिसांना मिळून आले होते. त्या अनुषंगाने पोलिसांच्या तपासात झंवर याने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आपले आर्थिक संबंध असल्याचे मान्य केल्याची माहिती समोर आली आहे, तसेच विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण यांनीदेखील सुनील झंवरला पोलीस कोठडी वाढवून मिळावी म्हणून केलेल्या युक्तिवादात झंवरने मंगेश चव्हाण यांच्यासोबत आर्थिक संबंध असल्याचे मान्य केले असल्याचे न्यायालयास सांगितले.

राजकीय षड्यंत्र असल्याचा केला होता आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बीएचआर घोटाळ्याशी माझा किंवा माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याचा संबंध नाही. पावत्या मॅचिंग, मालमत्ता खरेदी किंवा सुनील झंवर यांच्याशीहीदेखील माझा किंवा माझ्या कंपनीचा संबंध नाहीय, असे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावला घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. एवढेच नव्हे, तर राजकीय षड्यंत्रातून आपल्याला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपदेखील चव्हाण यांनी केला होता. दरम्यान, याप्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Web Title: Zanwar admits financial relationship with Chavan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.