पाचोरा (जि. जळगाव) : पाचोरा बसस्थानक परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबाराने शहरच हादरून गेले. दोन जणांनी गावठी पिस्तुलातून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आकाश कैलास मोरे (वय २६) हा जागीच ठार झाला. पूर्ववैमनस्य आणि आर्थिक देवाणघेवाणीतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आकाश मोरे (रा. छत्रपती शिवाजी महाराजनगर, पाचोरा) हा युवक बसस्थानकात दुचाकी बाजूला लावून उभा होता. याचवेळी तिथे आलेल्या दोन जणांनी गावठी कट्ट्यातून आठ ते दहा राउंड फायर केले. आकाश याच्या छातीवर गोळ्या लागल्याने तो जागीच ठार झाला. यावेळी गोळीबााराच्या आवाजाने बसस्थानक परिसरात एकच घबराट पसरली. प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या बसस्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. मारेकऱ्यांनी आकाश यास गाठून अगदी जवळून अंदाधुंद गोळीबार करीत त्याला ठार केले. त्याचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.पोलिसांनी तत्काळ बसस्थानक गाठले आणि बंदोबस्त तैनात केला. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबच्या टीमने उत्तरीय तपासणी केली. या घटनेने पाचोरा शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. आकाश मोरे हा अविवाहित असून, त्याच्या आईचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. तो सेंट्रिंग काम करीत होता. पोलिस भरतीसाठी त्याचे प्रयत्न सुरू होते, असे निकटवर्तीयांनी सांगितले.मारेकरी फरारदरम्यान, गोळीबार करून मारेकरी मोटारसायकलने पसार झाल्याचे नागरिकांनी सांगितले. मारेकरी याच परिसरातील असून, ही घटना आर्थिक देवाणघेवाणीतून झाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरपाचोरा बसस्थानकात पोलिस कक्ष उभारण्यात आला आहे; पण याठिकाणी कधीही पोलिस दिसत नाहीत. त्यामुळे पाचोरा बसस्थानकाची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. या परिसरात हाणामाऱ्या, चोऱ्या, पाकीटमार, सोनसाखळी चोरणे आदी प्रकार वारंवार घडत आहेत.