कथा, कादंबऱ्या आणि काव्यसंग्रहापासून तरुणाई झाली लांब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST2021-08-22T04:18:49+5:302021-08-22T04:18:49+5:30

मतीन शेख लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात अलीकडे वाचनालयात जाऊन पुस्तके वाचण्याचा कल कमी झाला ...

Youth has long gone from stories, novels and poetry collections | कथा, कादंबऱ्या आणि काव्यसंग्रहापासून तरुणाई झाली लांब

कथा, कादंबऱ्या आणि काव्यसंग्रहापासून तरुणाई झाली लांब

मतीन शेख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर : प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात अलीकडे वाचनालयात जाऊन पुस्तके वाचण्याचा कल कमी झाला आहे. तरुणाई मोबाईल आणि संगणकावर कळ दाबून उपलब्ध असलेली वाचन साहित्याच्या प्रेमात असली खरी पण प्रौढांचा कल आजही वाचनालयातून पुस्तके मिळवून वाचन करण्यावर भर आहे.

येथील सार्वजनिक वाचनालय सध्या नगरपंचायतीच्या अखत्यारीत आहे. वाचनालयाची स्थापना १९५० साली झाली. ७१ वर्षांच्या काळात वाचनालयाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. वाचनालयात जाऊन फेरफटका मारला असता वाचक वर्गातील अनेक बदल उमटून आल्याचे दिसून आले. गेल्या काळातील वाचन कक्षात तरुणाईचा राबता आता कमी झाला असून, त्यांची जागा प्रौढांनी घेतली आहे. वाचनालयातील पुस्तक खातेदार संख्या स्थिर असली तरी तरुण वाचक कमी झाले आहेत.

पुस्तकांची विपुल संपदा

सध्या वाचनालयात तब्बल २५ हजार ३८९ पुस्तकांची विपुल वाचन संपदा आहे यात कथा- ७८६०, कादंबरी- ८१३५, ऐतिहासिक -८०००, लेख संग्रह-१०९०, चरित्र- १२३०, विनोद -५३०, आरोग्य ३६०, नाटक-१०८०, प्रवासवर्णन-३१०, काव्यसंग्रह- ६४५, लेख- १०७५, शेती-३७०, इतर- ३४८१ अशी पुस्तकांची संपदा आहे. याच्या जोडीला १२ दैनिके, २० साप्ताहिके आणि ३० मासिके येथे येतात.

वाचकांची आवड निवड बदलली

बदलत्या काळानुसार वाचकांची आवड निवड बदलली असल्याचे चित्र आहे. गेल्या कालखंडात कथा, कादंबऱ्या, इतिहास आणि काव्यसंग्रह या पुस्तकांच्या वाचनाचा कल तरुणाईकडे अधिक होता. आता हा कल बदलता दिसून येत आहे. अलीकडे प्रौढ आणि सेवानिवृत्त कथा-कादंबऱ्या आणि काव्यसंग्रहाची मागणी करीत आहे, तर तरुणाई करंट अफेअर, एमपीएससी आणि यूपीएससीच्या पुस्तक वाचनाकडे वळली आहे.

तरुणाईची काव्यसंग्रहाकडे पाठ

शालेय, महाविद्यालयीन जीवनात प्रेम फुलविणाऱ्या तरुणाईची काव्यसंग्रहांची ओढ जणू लुप्त झाली आहे. कला शाखेत शिक्षण घेणारे मराठी आणि इंग्रजी विषयातील विद्यार्थी काव्यसंग्रहातील शब्दांचा उलगडा करण्यासाठी अगदी शब्दकोशाचा वापर करीत होते. आता मात्र काव्यसंग्रहाची पुस्तके जणू तरुण वाचकांची वाट पाहत आहेत. त्यात तर शब्दकोश मागणी करणारे चुकूनही दिसून येत नाही. कधी काळी वाचनालयात दैनिक, मासिक साप्ताहिक आणि पाक्षिक वाचनासाठी युवा वर्गाच्या उड्या पडायच्या. आज मात्र प्रौढ ही पुस्तके निवांतपणे चाळताना दिसून येत आहे.

स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मागणी

प्रगत युगात मोबाईल आणि संगणकावर चुटकीसरशी हवे ते पुस्तक मिळविणाऱ्या तरुणाईत आज एक वर्ग असाही दिसून आला की, जो स्पर्धा परीक्षा पुस्तकांची मागणी करतो तर काही तरुण इतिहासाची पुस्तके मागतात. एक मात्र दिसून आले की रंगमंच गाजविणाऱ्या नाटकांच्या पुस्तकाकडे तरुणाईने पाठ फिरवली आहे.

Web Title: Youth has long gone from stories, novels and poetry collections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.