जामनेर जि. जळगाव : सेल्फी काढण्याच्या नादात अजिंठा लेणीच्या सप्तकुंड धबधब्यात पडलेल्या युवकाला नागरिक व कर्मचाऱ्यांनी वाचविले. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. देवांशु राजेश मौर्या (२१, रा. नालासोपारा वेस्ट, पालघर) असे या तरुणाचे नाव आहे. तो जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे सर्व २३ मित्र अजिंठा लेणी बघायला गुरुवारी आले होते. सायंकाळी सर्व मित्र व्ह्यू पॉइंटवरून धबधब्याकडे आले. तेथे त्यांनी फोटो सेशन केले. काही विद्यार्थी या पाण्यात पोहण्याचा बेत आखत होते. मात्र तेथील सुरक्षा रक्षक व कर्मचारी यांनी त्याला विरोध केला. याचवेळी देवांशु हा सेल्फी काढताना पाय घसरून लेणीच्या सप्तकुंडात धबधब्यात पडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सोबत असलेले विद्यार्थी घाबरले. पुरातत्व विभागाचे शेख, भरत काकडे, सलीम शहा, शमीम अहेमद, भगवान ताठे, सुरक्षा रक्षक सुनील मगरे, रमेश काळे, सचिन कोलते, पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांच्यासह लेणापूर, सावरखेडा, पिंपलदरी येथील तरुणांनी दोर व गळ, बेल्टच्या साहाय्याने पाऊण तासाच्या अथक परिश्रमातून त्या तरुणाला वर काढले.
५० फूट खोल कुंड..
ज्या कुंडात तो तरुण युवक पडला होता ते कुंड जवळपास ५० फूट खोल आहे. पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहाने वाहत वाहत कुंडात पडला. त्याने दोन वेळा गटांगळ्या खाल्ल्या. पोहता येत असल्याने तो कसातरी कुंडाच्या कडेवर आला. त्यानंतर लोकांनी त्याला दोरीच्या साहाय्याने वर काढले आणि वाचवले.
फोटो ओळी : अजिंठा लेणीच्या सप्त कुंडात पडलेल्या त्या युवकाला बाहेर काढताना नागरिक, सुरक्षा रक्षक दिसत आहे. (फोटो : अर्पण लोढा, वाकोद)