Youth dies after drowning in river water | वाघूर नदीच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू

वाघूर नदीच्या पाण्यात बुडून युवकाचा मृत्यू


पहूर, ता.जामनेर : सकाळी शौचास गेलेल्या कसबेतील युवकाचा वाघूर नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली.
गेल्या दोन दिवसापासून वाघूर नदीला पूर असल्याने पाण्याचा प्रवाह वाढला आहे. या युवकाचा पाय घसरल्याने नदीच्या पात्रात पडला. शेख शाहरुख शेख आयुब (२७) हा युवक शौचास गेला असता नदीपात्रात पाय घसरून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घरचा एकुलता एक कर्ता विवाहित युवक असल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. या घटनेने ग्रामीण रुग्णालयातील सुविधांविषयी संतप्त भावना नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत.
शेख शाहरुख याचा पाय घसरल्याने खोल भागात साचलेल्या गाळात तो अडकला. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे. जवळपास पंधरा मिनिटे हा युवक पाण्यात होता. ही घटना चेतन जाधव व संजय यांच्या निदर्शनास येताच चेतनने पाण्यात उडी घेऊन संजयच्या सहकार्याने त्याला पाण्याच्या बाहेर काढले. प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावत यांनी त्याला मृत घोषित केले. या दरम्यान मोठा जमाव उपस्थित होता.
शवविच्छेदनगृहात युवक जिवंत असल्याच्या चर्चेने तणाव
युवकास मयत घोषित केल्यानंतर शवविच्छेदन रूममध्ये मृतदेह ठेवण्यात आला. यादरम्यान एका युवकाच्या हातचा दाब मयताच्या पोटावर पडल्याने तोंडावाटे पाणी बाहेर येऊन श्वास निघाल्याचे उपस्थित युवकांनी पाहिले. त्यामुळे युवक जिंवत असल्याच्या चर्चेने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याला रुग्णवाहिकेने जळगावला नेत असताना डॉक्टरांनी पुन्हा तपासून मृत असल्याचे सांगितले.
रग्णसेवेविषयी संताप
रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना सेवा मिळत नाही. घटनेनंतर शाहरूख बराच वेळ जिंवत होता. पण डॉक्टरांनी विशेष उपचार केले नाही. त्याला जिवंत असूनही मृत घोषित केले व शवविच्छेदन रूममध्ये ठेवले, असा संताप शाहरूखच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मात्र शाहरुख मृत झाला होता. त्यांनतरच शवविच्छेदन रूममध्ये मृतदेह पाठविला, असे रुग्णालयाकडून सांगितले आहे.

Web Title: Youth dies after drowning in river water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.