मित्राला ‌थोड्या वेळात येतो म्हणाला अन् तरुणानं घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 15:26 IST2021-02-27T15:24:30+5:302021-02-27T15:26:47+5:30

जानकी नगरातील घटना; मुलीच्या स्कार्फने घेतला गळफास

youth commits suicide in jalgaon by hanging himself | मित्राला ‌थोड्या वेळात येतो म्हणाला अन् तरुणानं घेतला जगाचा निरोप

मित्राला ‌थोड्या वेळात येतो म्हणाला अन् तरुणानं घेतला जगाचा निरोप

जळगाव : कार्यक्रमासाठी बोलवायला गेलेल्या गल्लीतील मित्राला थोड्या वेळाने येतो, असे सांगून नीलेश दगडू वाघ (२०) या तरुणाने राहत्या घरात मुलीच्या स्कार्फने गळफास घेतल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. नीलेश याने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र तो पोलिसांच्या रेकॉर्डवर होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश वाघ हा स्लाईडींगचे दरवाजे व खिडक्यांचे हातमजुरीवर कामे करायचा. शनिवारी गल्लीत कार्यक्रम असल्याने सकाळी ७.३० वाजता शेजारचा मित्र नीलेशला घरी बोलावण्यासाठी गेला. त्यावेळी थोड्यात वेळात येतो असे त्याने सांगितले. ९ वाजले तरी नीलेश आला नाही म्हणून हा मित्र परत बोलवायला गेला असता त्याने घरात मुलींच्या स्कार्फच्या सहाय्याने  गळफास घेतलेल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच बाहेर धुणीभांडी करायला गेलेली आई धावतच आली. मुलाला पाहून तिने एकच हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सुधीर साळवी, मुदस्सर काझी यांनी घटनास्थळ गाठून तरुणांच्या मदतीने मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.

बालपणीच हरपले पितृछत्र
नीलेश हा लहान असतानाच वडिलांचे निधन झाले आहे. आई शंकुतलाबाई व बहिण असाच त्यांचा परिवार होता. बहिण विवाहित असून ती सासरी नांदते. आई धुणी भांडी धुण्याचे काम करते. नीलेशने आत्महत्या का केली याबाबत सर्वांना आश्‍चर्यचा धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी आईच्या बोलण्यातून गल्लीतील काही जणांवर रोष असल्याचे जाणवल्याची माहीती पोलिसांनी दिली. दरम्यान, नीलेश याच्यावर नवरात्रीच्या काळात चॉपर हल्ला झाला होता. त्याशिवाय त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात एक गुन्हाही दाखल आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, मिलींद सोनवणे, सदानंद नाईक यांनी पंचनामा केला. घरात चिठ्ठी व इतर काही संशयास्पद आढळून आले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: youth commits suicide in jalgaon by hanging himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.