शॉक लागल्याने तरुण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2017 00:29 IST2017-04-05T00:29:59+5:302017-04-05T00:29:59+5:30
अमळनेर : दुभाजकात टाकलेल्या खांबात उतरला वीज प्रवाह

शॉक लागल्याने तरुण जखमी
अमळनेर : धुळे रस्त्यावरील पंचायत समिती सभापती बंगल्यासमोरील दुभाजकात लावलेल्या विद्युत खांबाचा शॉक लागल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
शहरातून जाणा:या राज्य महामार्गावर टाकलेल्या दुभाजकात विद्युत खांब उभारलेले आहेत. त्या विद्युत खांबातून अनेक वेळा वीज प्रवाह सुरू असतो. याबाबत नागरिकांनी नगरपरिषदेकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र पालिकेच्या दिवाबत्ती विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दुभाजकावर लावलेल्या जाळीतून नागरिक ये-जा करत असतात. सोमवारी रात्री शिव कॉलनी भागातील रहिवासी विलास रमेश लिंगायत (24) हा तरुण पं.स. सभापती बंगल्याकडून पलीकडे असलेल्या मेडिकलवर या दुभाजकात लावलेल्या जाळीतून जात होता. तेथील विद्युत खांबाचा त्याला शॉक लागला. त्याचा उजवा हात त्या खांबाला चिटकल्याने तो बराच वेळ लटकलेला होता. त्यानंतर तो खाली पडला. बेशुद्धावस्थेत त्याला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत विलासचा उजवा हात खांद्यातून निखळला आहे. चेह:यावर आणि जिभेवर काळे डाग पडले आहेत. खांद्यावर शस्रक्रिया करावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च येणार आहे.
विलासच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. त्या तरुणाचा सर्व वैद्यकीय खर्च पालिकेने करावा, अशी मागणी विलासच्या कुटुंबाने केली आहे. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार त्या तरुणावर ओढवल्याचे बोलले जात आहे.
नगरपरिषदेने तत्काळ दुभाजकातील विद्युत खांबांची तपासणी करावी व पुढे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे. घटनेनंतर वीज वितरण कंपनीचे लाईनमन माधव चौधरी यांनी सोमवारी रात्री या ठिकाणी पाहणी केली. त्या वेळी त्यांनी खांबात वीज प्रवाह नसल्याचे सांगितले होते. मात्र सदर खांब न.प.च्या अखत्यारित येत असल्याने आपण काही करू शकत नसल्याचे त्यांनी उपस्थित नागरिकाना सांगितले होते. (वार्ताहर)