लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील
जळगाव : जागतिक हवामान बदलाचे परिणाम आता मान्सूनवर देखील जाणवू लागले आहे. यावर्षी जिल्ह्यात झालेल्या पावसाच्या स्थिती वरून हवामान बदलाचे अंदाज लावता येत आहेत. जिल्ह्यात दरवर्षी अरबी समुद्राकडून येणाऱ्या मान्सूनमुळे ९० टक्के पाऊस होत असतो. मात्र, यावर्षी जिल्ह्यात एकूण झालेल्या पावसाच्या टक्केवारीत ६० टक्के पाऊस हा अरबी समुद्रामुळे नाही तर बंगालच्या उपसागरामुळे झाला आहे. हवामान बदलाचे हे परिणाम असून, जिल्ह्याच्या मान्सूनच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यात बंगालच्या उपसागरामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस झाला आहे.
हवामान बदलाचा परिणाम
जागतिक हवामान बदलाचा परिणाम मान्सूनसह इतर हंगामावर देखील झालेला दिसून येत आहे. नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान पाचही महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यातही बंगालचा उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या हवेचा कमी दाबाचा परिणाम होता. २०१९ व २०२० मध्ये जिल्ह्यात मान्सूनच्या वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल ४० ते ४५ टक्के जास्त पाऊस झाला आहे. त्यात बंगालच्या उपसागरामुळे एकूण टक्केवारी ही देखील ३० ते ४० टक्के होती. तीच टक्केवारी यावर्षी ६० टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.
सप्टेंबर महिन्यात तब्बल १४६ टक्के पाऊस
जून ते ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यात एकूण सरासरीपेक्षा ही १५ टक्के कमी पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, २९ ऑगस्टपासून पुन्हा पाऊस सक्रिय झाल्यामुळे एकूण सरासरीच्या जवळपास ९४ टक्के पाऊस होऊन जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती निवारली आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात यावर्षी तब्बल १८० मिमी इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात १२३ मिमी इतक्या पावसाचा अंदाज असतो, मात्र, यावर्षी सरासरीच्या १४६ टक्के इतका पाऊस झाला आहे.
पावसाळ्यातील चारही महिन्यात झालेला पाऊस
महिना - दरवर्षी सरासरी होणारा पाऊस - झालेला पाऊस
जून - १२३ मिमी - ११७ मिमी
जुलै - १८९ मिमी - १३३ मिमी
ऑगस्ट - १९६ मिमी - १७२ मिमी
सप्टेंबर - १२३ मिमी - १८० मिमी
काय झाला परिणाम ?
जिल्ह्यात केरळ मार्गे अरबी समुद्राकडून नैऋत्य मान्सूनचा पाऊस नेहमी होत असतो. मात्र, यावर्षी जून व जुलै महिन्यात झालेला पाऊस हा नैऋत्य मान्सूनचा होता. अनेकवेळा अरबी समुद्राकडून येणारे ढग हे जिल्ह्याकडे न येता थेट गुजरातमार्गे मध्य प्रदेशकडून उत्तरेकडे रवाना झाले. त्यामुळे अरबी समुद्राकडील मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात झालाच नाही. त्या तुलनेत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र हे थेट ओडिसा पासून ते मराठवाडा ते खान्देश पर्यंत होते. त्यामुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात जोरदार पाऊस झाला. याच पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे प्रकल्प भरले तसेच दुष्काळाची स्थिती देखील टळली आहे.
कोट..
जागतिक हवामान बदलाचे हे परिणाम आहे. यंदा बहुतेक महाराष्ट्रात बंगालच्या उपसागरामुळे पाऊस झाला आहे. विशेष करून मराठवाडा , विदर्भ व खान्देशात. आता नैऋत्य मान्सून देखील सक्रिय झाला आहे. सप्टेंबर महिन्यात पूर्ण राज्यभर पाऊस कायम राहणार आहे. १५ दिवसानंतर परतीचा म्हणजेच ईशान्य मान्सून सक्रिय होईल.
-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे