वुशूपटूला मृत्यूने हरवले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 00:29 IST2018-02-07T00:25:14+5:302018-02-07T00:29:46+5:30
अपुºया सरावाने घेतला बळी : जखमी वुशू खेळाडू अनिल बोरसेचा पाच महिन्यांनी मृत्यू

वुशूपटूला मृत्यूने हरवले!
जळगाव : पाच महिन्यांपासून दुखापतींशी झुंज देणारा जळगावचा वुशू खेळाडू अनिल अरविंद बोरसे (वय २३) याचा मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी पहाटे पाच वाजता घडली.
अनिल याला नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत मणका आणि मज्जारज्जूंना गंभीर दुखापत झाली होती.
शहरातील एका सलूनमध्ये काम करणाºया अरविंद बोरसे यांचा एकुलता मुलगा असलेल्या अनिलने पोलिसात भरती होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी त्याने दोन ते तीन वेळा भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र त्याला यश आले नाही. त्याच वेळी त्याला वुशू या मार्शल आर्ट खेळाच्या संघटनेच्या पदाधिकाºयांनी नोकरीसाठी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्या आमिषाने तो नांदेड येथे १८ ते २१ आॅगस्टदरम्यान झालेल्या १५ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ अजिंक्यपद वुशू स्पर्धेत सानसू आणि ताऊलू या प्रकारात सहभागी झाला होता. स्पर्धेच्या दोन फेºयांमध्ये खेळलेला अनिल अखेरच्या फेरीसाठी पात्र ठरला.
त्या वेळी काहीसा थकलेला असताना पहिल्या दोन मिनिटातच प्रतिस्पर्धी खेळाडूचा जोरदार फटका मानेला बसल्याने अनिल निपचित पडला. त्यानंतर पाच महिने त्याने मृत्यूशी झुंज दिली. त्याची ही झुंज मंगळवारी पहाटेच्या सुमारास संपली.
नांदेड येथे झालेल्या दुखापतीनंतर संघ व्यवस्थापकांनी अनिलचे वडील अरविंद बोरसे यांना या प्रकाराची माहिती दिली आणि नांदेड येथे बोलावून घेतले.
बोरसे यांना संघटना आणि संघ व्यवस्थापकांनी कोणतीही मदत केली नाही. नांदेड येथे केलेल्या उपचाराचा खर्चदेखील बोरसे यांनी केला. त्यानंतर अनिल याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. काही काळाने त्याला हात हलवता येत होते. मात्र पुढच्या उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले.
दोन महिन्यांपूर्वी अनिलला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. त्यानंतर घरीच उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्याला सर्दीमुळे श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. त्या वेळी एका खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच महिने मृत्यूशी झुंज दिल्यावर अनिल बोरसे पराभूत झाला.
अनिलच्या पश्चात आई - वडील, बहिणी असा परिवार आहे.