जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन - गुटखाबंदी केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST2021-05-31T04:13:32+5:302021-05-31T04:13:32+5:30
मुक्ताईनगर : महाराष्ट्र सरकारने तंबाखू, गुटखाबंदी लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण आणता आले नाही. ...

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन - गुटखाबंदी केवळ कागदावरच
मुक्ताईनगर : महाराष्ट्र सरकारने तंबाखू, गुटखाबंदी लागू केली असली तरी अद्यापही गुटखा विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण आणता आले नाही. राज्यातील अनेक भागांमध्ये अद्यापही सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. सध्याच्या लॉकडाऊन काळात एक वेळ गावात दूध, तेल, भाजी या जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत, पण गल्लोगल्ली तंबाखूजन्य वस्तू सहज उपलब्ध आहेत. परिणामी राज्यातील तंबाखू, गुटखाबंदी कागदावरच आहे.
तंबाखू उत्पादनात आपला देश अग्रेसर आहे. त्या तुलनेत देशात व्यसनाधीनता गंभीर होत आहे. पूर्वीच्या प्रचलित तंबाखू वापराला अलीकडच्या तंबाखू प्रक्रिया उद्योगाने मोठी व्याप्ती मिळविली आहे. तंबाखू आणि अपायकारक रासायनिक घटक मिळवून तयार होणारे तंबाखूजन्य पुड्या मानवी शरीरास प्रचंड अपायकारक ठरत आहेत.
दरवर्षी आठ-नऊ लाख लोकांचा मृत्यू
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, जगात दरवर्षी जवळपास ६० लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनाने होतो. तसेच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार वर्ष २०३० पर्यंत जगामध्ये ८० लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू हा तंबाखूच्या सेवनामुळे होण्याचे भाकीत व्यक्त करण्यात आले आहे. सन २००४ च्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे आठ-नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारांमुळे होतो.
असे जडते व्यसन
जाणकार म्हणतात, तंबाखूमध्ये निकोटीन असते. त्यामुळे मेंदूला चालना मिळते. ते घेतले की माणसाला उत्साही, छान वाटू लागते. त्याची माणसाला सवय होते. त्यामुळे नंतर एकदाच खाऊन माणसाचे समाधान होत नाही. त्याला ती सारखी खावीशी वाटू लागते. दुसरे कारण म्हणजे तलफ आल्यावर तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ घेतले नाही तर त्याची सवय झालेल्या माणसांना अस्वस्थ वाटू लागते. यातूनच तंबाखूचे व्यसन जडते.
तंबाखूजन्य पदार्थांचा वापर
सुगंधित तंबाखू, गुटखा, खैनी, सिगारेट, सिगार, बीडी, चिलम, मलई स्नफ (दात पेस्ट), क्रेटेक्स, पाइप्स, स्नफ, वॉटर पाइप्स (हुक्का), स्नस अशा बऱ्याच प्रकारांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचा वापर तलफ किंबहुना व्यसन भागविण्यासाठी केला जातो.
दुष्परिणाम
तज्ज्ञांच्या मते तंबाखूच्या वापरावर बंदी घालणे किंवा थांबविणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मोनरी डिसीज (सीओपीडीदेखील म्हणतात) प्रामुख्याने तोंडाचे व फुप्फुसाचे कर्करोग, हृदयाचे व रक्तवाहिन्यांचे विकार, श्वसनसंस्थेचे विकार जसे की, अस्थमा, ब्रॉन्कायटिस इत्यादी आजार, मेंदूला रक्ताचा अपूर्ण पुरवठा व त्यामुळे येणार पक्षाघात किंवा इतर आजार हे काही महत्त्वाचे आरोग्यावर होणारे परिणाम आहेत. त्याचबरोबर पचनसंस्थेचे आजार, यामध्ये अपचन, जळजळ, बद्धकोष्ठ हे सर्रास आढळणारे दुष्परिणाम आहेत.
तंबाखूमुक्त शाळा अभियान यशस्वी
राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सूचना देणे याचा अंतर्भाव होतो. यात तंबाखूमुक्त शाळा हे अभियान राबविणाऱ्या शाळांचा प्रतिसाद लक्षणीय आहे.
कोट्यवधींची उलाढाल
राज्यात गुटखाबंदी असली तरी इतर राज्यांतून गुटखा तस्करी करून महाराष्ट्रात आणला जात आहे. राज्याच्या प्रत्येक सीमावर्ती भागात लगतच्या राज्यातून गुटखा तस्करी केली जाते. यात प्रामुख्याने, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून गुटखा आणला जातो. यात सर्वाधिक गुटखा मध्य प्रदेशातून आणला जातो. अनेक ठिकाणी महाराष्ट्र आणि गुटखा आणल्या जाणाऱ्या लगतच्या राज्यातील सीमा भागात मोठ्या प्रमाणात गुटख्याची गोदामे आहेत. हा गुटखा विक्रेत्यांपर्यंत पोहोचविणारी मोठी यंत्रणा कार्यरत आहे. अगदी तीनचाकी रिक्षापासून ते मोठमोठ्या कंटेनरचा वापर करून गुटखा तस्करी होत आहे. तस्करांचे पोलीस आणि नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेशी असलेले लागेबांधे यातून कोट्यवधींची उलाढाल असलेला गुटखा बाजार राज्य सरकारने घेतलेल्या गुटखाबंदीचा फज्जा उडवीत आहे.