लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला मुख्य अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्याचा कामाला आता सोमवारचा मुहूर्त मिळाला आहे. तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या या कामाला आता सोमवारपासून सुरुवात होणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सोमवारी कामाला सुरुवात झाल्यानंतर पंधरा दिवसात विद्युत खांब स्थलांतरीत करण्याचे काम पुर्ण होणार आहे.
मनपा प्रशासनाने २५ कोटींमधील शिल्लक निधीतील दीड कोटी रुपयांचा निधी महावितरणकडे वर्ग केल्यानंतर आता या कामाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, शुक्रवारी मनपा व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या ठिकाणी जावून पाहणी केली. पुलाची पाहणी केल्यानंतर विद्युत खांब हटविण्यासाठी कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशा प्रकारे केले जाणार स्थलांतर
शिवाजी नगर उड्डाणपुलापासून ते टॉवर दरम्यान उच्च दाबाची विद्युत लार्इन बंद करावी लागणार आहे. त्या ठिकाणचे विद्युत खांब काढून टाकावे लागतील. या संपुर्ण भागात अंडरग्राऊंड हायटेन्शन लार्इन टाकावी लागणार आहे. यासोबतच वीज ग्राहकांसाठी कमी दाबाची लार्इन अंडरग्राऊंड टाकावी लागेल. पुलापासून टॉवरपर्यंत रस्त्यात एकही पोल उभारला जाणार नसून उच्च दाबाची विद्युत लार्इन ही अंडरग्राऊंड टाकली जाणार आहे. तसेच ग्राहकांना कनेक्शनसाठी ठिकठिकाणी फिडर पिलर उभारले जाणार आहेत.
फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होवू शकतो पुल ?
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे आतापर्यंत ६० टक्के पुर्ण झाले असून, विद्युत खांबाचा प्रश्न जर वेळीच मार्गी लागला असता तर पुलाचे काम आतापर्यंत पुर्ण झाले असते. दरम्यान, विद्युत खांब स्थलांतर करण्याचे काम महावितरणने महिनाभरात पुर्ण केले तर पुलाचे उर्वरित काम फेब्रुवारी २०२२ पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता आहे. मक्तेदाराकडून गर्डर तयार करण्याचे सुरुच ठेवले असून, केवळ विद्युत खांब स्थलांतरीत होण्याचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.