- ४५० मीटर लांबीचा होणार पूल
- ५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
- ५ वर्षांपुर्वी झाली होती घोषणा
- २६ महिन्यांची होती मुदत
- नोव्हेंबर मध्ये काम सुरु झाल्यास मार्च २०२३ मध्ये पूर्ण होणार काम
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील नागरिकांसह जळगाव, चोपडा व यावल तालुक्यातील नागरिकांना शहरात येण्यासाठी सोईचा ठरणारा पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम केवळ एका मंजुरीसाठी थांबले आहे. मुंबई येथील रेल्वेच्या मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळाली तर पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात करता येईल अशी माहिती महारेलचे असिस्टंट मॅनेजर संजय बिराजदार यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. रेल्वेने सर्व तांत्रिक मान्यता पुर्ण केल्या असून, आता केवळ मुख्य कार्यालयाकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळण्याची प्रतीक्षा आहे.
पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुल तयार करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. तब्बल पाच वर्षांपूर्वी या पुलाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक मान्यता, निधीची पुर्तता अशा समस्यांमुळे या पुलाचे काम अद्यापही सुरु झालेले नाही. त्यात पुलालगत भोईटेनगरकडून येणाऱ्या आर्ममुळे देखील या कामाला तब्बल दोन वर्ष उशीर झाला. आता रेल्वे प्रशासन कोणत्याही फेऱ्यात न अडकता थेट पुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठी आग्रही आहे. मात्र, मुंबई येथील मुख्य कार्यालयाची मंजुरी पुलाच्या कामासाठी अद्यापपर्यंत मिळालेली नाही. विशेष म्हणजे पुलाच्या कामासाठी महारेलने सर्व प्रकारचे डिझाईन तयारी करून, कामाचीही अंतिम तयारी पुर्ण केली आहे.
पाच वर्षांपासून प्रश्न प्रलंबित
शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या आधी पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, पुलालगत असलेला आर्म, पुलाचे काम कोण करणार ?, बांधकाम विभागाकडील निधी अशा अडचणींमुळे या पुलाचे काम पाच वर्षात देखील अद्यापही सुरु होवू शकलेले नाही. आता महारेलने संपुर्ण प्रक्रिया पुर्ण केली असताना केवळ एका मंजुरीसाठी तब्बल सहा महिन्यांपासून या पुलाचे काम सुरु होवू शकलेली नाही.
शहरातील वाहतूककोंडीचा कायमचा प्रश्न लागणार मार्गी
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम मार्च २०२२ पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता असून, पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलाचे काम नोव्हेंबर महिन्यात सुरु झाले तर मार्च २०२३ पर्यंत या पुलाचे काम पुर्ण होणार आहे. या दोन्ही पुलांचे काम पूर्ण झाल्यास शहरातील मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतुकीच्या प्रश्नावर कायमचा तोडगा निघण्याची शक्यता आहे. पिंप्राळा रेल्वेगेटवरून दिवसाला तब्बल ६५ ते ७५ रेल्वे ये-जा करतात, यामुळे हे रेल्वेगेट दिवसातून बऱ्याचवेळा बंद असते. हे गेट बंद राहत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी देखील होत असते. पुलाचे काम पुर्ण झाल्यानंतर याठिकाणचा वाहतुकीचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.
आर्मसाठी रेल्वेने मनपाला दिले नवीन डिझाईन
एकीकडे शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरु करून अडीच वर्षात देखील या पुलाचे काम अद्याप पुर्ण होवू शकलेले नाही. तर दुसरीकडे पाच वर्षांपुर्वीच मंजुरी मिळालेल्या पिंप्राळा रेल्वेगेटवरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला अद्याप सुरुवात देखील झालेली नाही. आता रेल्वे प्रशासनाने मनपाकडे पुलालगत असलेल्या आर्मसाठी नवीन डिझाईन दिले असून, तत्काळ ही जागा भूसंपादित करून मनपाच्या ताब्यात घेण्याचा सूचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
कोट..
काही तांत्रिक मान्यतांसाठी या पुलाचे काम रखडले आहे. या मान्यता लवकरच मिळणार आहेत. या मान्यता मिळाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात या पुलाच्या कामाला सुरुवात करण्यावर भर आहे. महारेलने सर्व प्रकारची तयारी पुर्ण आहे. मुख्य कार्यालयाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
-संजय बिराजदार, असिस्टंट मॅनेजर, महारेल