जळगाव : महानगरपालिका निवडणुकीतील भाजपाच्या विजयी उमेदवाराच्या घरी रविवारी पैशांसाठी महिला धडकल्या. मतदान केल्यानंतर प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचे कबूल करूनही ‘टोकन’ची रक्कम न दिल्याने प्रभाग १६ मधील महिलांनी भाजपा नगरसेवकाच्या घराबाहेर गर्दी केल्याचे स्थानिकांचे म्हणणे होते.घराबाहेर खूप गर्दी झाल्याने प्रभाग १६-क मधील भाजपा नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी पोलिसांना फोन केला, त्यानंतर ही गर्दी पांगली. सुमारे ५०० महिला आल्या होत्या. पोलीस आल्यानंतर काहींनी काढता पाय घेतला तर काहींनी पोलिसांसमोरच काळे यांच्याकडे पैशांची मागणी केली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. काळे यांनी त्याचा इन्कार केला आहे.प्रभाग १६ मध्येच भाजपाचे नगरसेवक भगत बालाणी यांच्याकडेही काही मतदार पैशांची मागणी करण्यासाठी गेल्याची माहिती पुढे आली आहे. उमेदवाराने काहीशी रक्कम देऊन त्यांचे समाधान केल्याचे समजते, मात्र त्याबाबत अधिकृतपणे कोणी काहीही सांगितले नाही.>पैसे मागितल्याचा नगरसेविकेकडून इन्कारनगरसेवकपदी निवडून आल्यामुळे काही जण अभिनंदनासाठी पुष्पगुच्छ घेऊन माझ्या घरी आले होते. पैसे मागण्याचा विषयच नाही. विरोधकांनी आणखी लोक पाठवून घराजवळ गर्दी केली.- रेश्मा कुंदन काळे,नगरसेविका, भाजपानिवडणुकीतील विजयानंतर शुभेच्छा देणाऱ्यांचीच गर्दी होती. कुणालाही पैसे वाटण्याचा प्रश्नच नव्हता.- प्रकाश बालाणी, नगरसेवक भगत बालाणी यांचे बंधूएका उमेदवाराच्या घरासमोर गर्दी झाली आहे, अशी माहिती कुणीतरी मोबाइलवरून दिली. खबरदारी म्हणून तातडीने तेथे कर्मचारी पाठविले होते. पैसे मागणे किंवा न देणे याबाबत कोणीच तक्रार देण्यासाठी अद्याप पुढे आलेले नाही.- अनिरुद्ध आढाव, पोलीस निरीक्षक
टोकनच्या पैशांसाठी भाजपा नगरसेविकेच्या घरी धडकल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 05:36 IST