Without Central Bank Manager to Mamurabad | ममुराबादला सेंट्रल बँंक व्यवस्थापकाविना
ममुराबादला सेंट्रल बँंक व्यवस्थापकाविना

ममुराबाद, ता. जळगाव : सेंट्रल बँकेच्या येथील शाखेत गेल्या चार महिन्यांपासून व्यवस्थापक पद रिक्त असल्याने असंख्य कर्ज प्रकरणे रखडली असून, शेतकऱ्यांसह स्वयंसहाय्यता बचतगटाच्या महिलांना त्यामुळे गैरसोयींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. बँकेच्या नियमित व्यवहारांवरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
ममुराबादसह परिसरातील धामणगाव, नांद्रा खुर्द, खापरखेडा, तुरखेडा आदी गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या सेंट्रल बँकेच्या शाखेत सुमारे २० हजारपेक्षा जास्त खाते धारकांचा व्यवहाराच्या निमित्ताने संपर्क येत असतो. श्रावणबाळ निवृत्तीवेतन व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींनाही याच शाखेतून पैसे अदा केले जातात. ग्राहकांची मोठी संख्या लक्षात घेता या बँकेत दोन रोखपालांची पदे स्थापित केली आहेत. प्रत्यक्षात त्याठिकाणी केवळ एकच रोखपाल सध्या कार्यरत आहे. दुसरे पद गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने बँकेत पैसे भरणाऱ्यांसह काढणाºयांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते. घाई गर्दीत असलेल्यांकडून त्याबद्दल बँक प्रशासनाला जाब देखील विचारला जातो. मात्र, मुख्य व्यवस्थापकच जागेवर नसल्यानंतर त्यांची कोणीच दादपुकार घेत नसल्याची स्थिती आहे.
यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून व्यवस्थापकाचे पद भरले जात नसल्याची माहिती कार्यालयीन कर्मचारी एम. डी. देखणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

बचतीच्या माध्यमातून बँकेत पत निर्माण करण्यासाठी आम्ही महिलांनी ममुराबाद येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत बचतगटाच्या नावे खाते उघडले आहे. त्यात आम्ही गेल्या वर्षभरापासून नियमितपणे पैसे देखील भरत आहोत. मात्र, बँकेकडून आम्हाला प्रत्येकवेळी व्यवस्थापक नसल्याचे कारण सांगून नवीन कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
-स्वयंसहाय्यता बचतगटाची एक महिला.

Web Title:  Without Central Bank Manager to Mamurabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.