श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

By विलास बारी | Published: January 5, 2024 11:45 PM2024-01-05T23:45:20+5:302024-01-05T23:45:48+5:30

बालगंधर्व संगीत महोत्सवास जळगावात सुरवात; रागा फ्युजन बँडचे होईल सादरीकरण

With Shyam Kalyan Bandish, lovers mesmerize with Kathak Jugalbandi | श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

श्याम कल्याण बंदिशसह, कथ्थक जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध

जळगाव : कान्हदेशचा सांस्कृतिक मानदंड असलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सव पहिल्या दिवशी ज्ञानेश्वरी व कार्तिकी गाडगे यांच्या अभिजात संगीतासह पंडित अनुज मिश्रा यांच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित २२व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची ''नादातून या नाद निर्मितो...श्रीराम जय राम..'' ही संकल्पना आहे. महोत्सवाची सुरुवात शंखनादाने झाली. सूत्रसंचालन दीप्ती भागवत यांनी केले.

दीपप्रज्वलनावेळी माजी महापौर जयश्री महाजन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.चे सौमिक कुमार, जैन इरिगेशनच्या सुलभा जोशी, प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर, सचिव अरविंद देशपांडे, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, उपस्थित होते. डाॅ. अर्पणा भट, शरद छापेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलावंताचे स्वागत करण्यात आले.

बालकलाकारांकडून स्वरांची रुजवात...

महोत्सवात ज्ञानेश्वरी व कार्तिकी गाडगे या भगिनींनी शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनांनी स्वरांची रुजवात केली. सुरुवात राग श्याम कल्याणमध्ये रामकृष्णा हरीने झाली. त्यानंतर नारायण रमा रमणा, याद पिया की आये, मुरलीधर शाम सुंदरा, सुरत पिया की, पद्नाम नारायण , राम का गुणगान, अभंग बोलवा विठ्ठल तीर्थ विठ्ठल, विष्णू मय जग, वृदांवन..अशी एकाहून एक सुरेख अभिजात संगीताची मेजवानी ज्ञानेश्वरीने रसिकांना दिली. तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर यांनी, तर थाळवर अरुण नेवे यांनी साथसंगत दिली.

कथ्थक जुगलबंदीने घातली भुरळ

दुसऱ्या सत्रात पं.अनुज मिश्रा व विनिता कारकी यांची कथ्थकवरील जुगलबंदीने जळगावकर श्रोत्यांना भुरळ घातली. सुरुवातीला शिव आणि शक्तीचे वर्णन असलेले शिववंदना सादर केली. रावणरचित शिवतांडव, आनंदतांडवसारखे प्रकार सादर करून शिवशक्तीचा जागर केला. विलंबित त्रितालामध्ये लखनौ घराण्याचे वैशिष्ट्ये त्याची नजाकत त्यांनी थाट, परणजुडी आमद तसेच तबल्यासोबत जुगलबंदी सादर केली. मध्य लयीत तोडे, तुकडे तसेच परन सादर करून मध्य लयीचा समारोप ५५ चक्करचा तोडा करून केला. त्यानंतर सुप्रसिद्ध भजन ''अनेका एक रूप'' हे कृष्णभजन वनिता कारकी यांनी सादर केले. बाजीराव मस्तानी चित्रपटातील ''मोहे रंग दो लाल'' या गीतावर अनुज मिश्रा यांनी नृत्य प्रस्तुत केले. सरतेशेवटी १०३ चक्करचा तोडा करून रसिकांना अचंबित केले. श्री ''रामचंद्र कृपालू भज मन'' ही तुलसीदांची रचना सादर करून समारोप केला.

Web Title: With Shyam Kalyan Bandish, lovers mesmerize with Kathak Jugalbandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.