लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरोग्यसेविका म्हणून २४ वर्षे सेवा देऊन सेवानिवृत्त होऊनही पदोन्नतीचा आर्थिक लाभ आपल्याला मिळालेला नसून जिवंतपणीच हा लाभ द्यावा, अशी आर्त हाक ऐनपूर ता. रावेर येथील सेवानिवृत्त आरोग्यसेविका मंगला सांडू निंबाळकर यांनी दिली आहे. वारंवार आरोग्य विभागाला अर्ज करूनही आता सेवापुस्तकच गहाळ झाल्याचे कारण देण्यात येत असल्याने जि. प. आरोग्य विभागाचा आणखी एक भेांगळ कारभार समोर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पदोन्नत्यांबाबतच्या असंख्य तक्रारी समोर येत आहे. वारंवार या विषयावर वादळी चर्चा होऊनही कर्मचाऱ्यांना लाभ मिळालेला नाही. अधिकारी कुठलीच कार्यवाही करीत नसून वरिष्ठांकडूनही यात कुठल्याच हालचाली होत नसल्याने आता मात्र, संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. सदस्य, पदाधिकारी विविध सभांमध्ये हा मुद्दा मांडून मांडून थकले असून त्यांनाही आश्वासनाशिवाय काहीच मिळत नसल्याने सदस्यांनीही आता हा विषय सोडून दिल्याचे चित्र आहे. कर्मचारी मात्र, हक्कापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे.
२०१९ चा अर्ज आणि कार्यवाही नाही
मंगला निंबाळकर यांनी २०१९ मध्ये अर्ज दिला मात्र, याबाबत कुठलीही कार्यवाही आरोग्य विभागाकडून झालेली नाही. त्यांच्यासोबत कार्यरत अन्य एका आरोग्य सेविकेला पदोन्नतीचा लाभ मिळाला होता. दरम्यान, आपल्याला सेवानिवृत्तीनंतर या दोनही पदोन्नती रकमेचा लाभ मिळावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.