पतीचा खून करीत पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 19:16 IST2019-03-03T19:14:03+5:302019-03-03T19:16:33+5:30
जामनेर रोडवरील स्वत:च्या घरात झोपलेल्या संदीप उत्तम पवार (२५) यांचा पत्नी कोमल (वय २१) हिने पेव्हर ब्लॉकने (फरशी) चेहरा ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नेरी, ता. जामनेर येथे घडली.

पतीचा खून करीत पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
नेरी, जि.जळगाव - येथील जामनेर रोडवरील स्वत:च्या घरात झोपलेल्या संदीप उत्तम पवार (२५) यांचा पत्नी कोमल (वय २१) हिने पेव्हर ब्लॉकने (फरशी) चेहरा ठेचून खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नेरी, ता. जामनेर येथे घडली. पतीचा खून करून पत्नी कोमल हिनेही फिनाइल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. खुनाचे कारण स्पष्ट नसून वेगवेगळ््या चर्चेला उधाण आले आहे.
संदीप उत्तम पवार हा नेहमीप्रमाणे घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत शनिवारी रात्री झोपलेला होता. रविवारी सकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास पत्नी कोमल हिने पेव्हर ब्लॉक (फरशी) घेऊन तो झोपेतच असलेल्या संदीपच्या चेहऱ्यावर सपासप वार करुन चेहरा ठेचला. या घटनेत संदीप हा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला जळगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविले मात्र त्याठिकाणी त्याला मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान सदर घटनेची माहिती घरात समजताच बिथरलेल्या कोमलने घरातील फरशी पुसण्याचे फिनाइल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला घरातील काही महिलांनी पकडून ठेवले असता तिने भिंतीवर आपले डोके आपटून स्वत:ला जखमी करून घेतले. तिलादेखील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आरोपी पत्नी कोमल हिचे माहेर जवळ असलेल्या मोहाडी येथील आहे. सदर घटनेमुळे गावासह परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.