पत्नी व मुलगा कामावर; घरात पतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:56+5:302021-08-18T04:21:56+5:30
जळगाव : पत्नी व मुलगा कामावर गेलेले असताना घरात कुणी नसल्याचे पाहून मंगल प्रताप पाटील (वय ४५) यांनी राहत्या ...

पत्नी व मुलगा कामावर; घरात पतीची आत्महत्या
जळगाव : पत्नी व मुलगा कामावर गेलेले असताना घरात कुणी नसल्याचे पाहून मंगल प्रताप पाटील (वय ४५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता शिवाजी नगरातील खडके चाळ भागात घडली. पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण अजून तरी समोर आलेले नाही. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंगल पाटील हे वाहनचालक होते. सध्या ते कुठेच कामावर नव्हते. मुलगा शुभम हा खासगी नोकरी करतो तर पत्नी शिवाजी नगरातीलच पापड उद्योगात कामाला जाते. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता पत्नी व मुलगा कामाला गेलेले असताना मंगल पाटील यांनी गळफास घेतला. घराचा दरवाजा बंद होता व बाहेरुन कुलूप नसल्याचे मंगल पाटील यांच्या भावाच्या लक्षात आले. त्यांनी वरच्या मजल्यावर जाऊन पाहिले असता आतून कडी लावलेली होती. आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता पाटील यांनी गळफास घेतल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी लागलीच दरवाजा तोडला. जावई गुणवंत दिनेश जाधव यांनी शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली, मात्र दीड तास पोलीस घटनास्थळी आलेच नाहीत.
मंगल पाटील हे मूळचे रेल, ता. धरणगाव येथील मूळ रहिवासी होते. अनेक वर्षापासून ते शिवाजी नगरात स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी वर्षा, मुलगा शुभम, भाऊ, मुलगी प्रणाली व जावई गुणवंत जाधव असा परिवार आहे.