पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:21 IST2021-08-18T04:21:52+5:302021-08-18T04:21:52+5:30
सचिन देव जळगाव : कोरोनाचे टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल झाल्यानंत रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्यात स्थगित केलेल्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात ...

पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का?
सचिन देव
जळगाव : कोरोनाचे टप्प्या-टप्प्याने निर्बंध शिथिल झाल्यानंत रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्प्यात स्थगित केलेल्या सर्व रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहे. सद्य:स्थितीला पॅसेंजर वगळता ८० टक्के एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. १५ ऑगस्टपासून शासनाने मुंबईतील लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी पुन्हा सुरू झाली आहे. मात्र, भुसावळ विभागातील पॅसेंजर सेवा अद्यापही बंदच आहे. पॅसेंजर सुरू करण्याबाबत रेल्वे प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. अनलॉक नंतरही पॅसेंजर बंद का? असा प्रश्न चाकरमानी व प्रवाशांमधून उपस्थित करण्यात येत आहे.
इन्फो:
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे
भुसावळ-देवळाली पॅसेंजर, भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ-अमरावती पॅसेंजर, भुसावळ-नागपूर पॅसेंजर, भुसावळ-बडनेरा पॅसेंजर, चाळीसगाव- धुळे पॅसेंजर सध्या बंद आहेत.
इन्फो :
बंद असलेल्या एक्स्प्रेस
रेल्वे प्रशासनाने जूनपासून टप्प्या-टप्प्याने ८० टक्के रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. फक्त हुतात्मा एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस या दोनच गाड्या सध्या बंद ठेवल्या आहेत, तर या गाड्या कधी सुरू होणार, याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
इन्फो :
सुरू असलेल्या एक्स्प्रेस
काशी एक्स्प्रेस, कामायनी एक्स्प्रेस, पवन एक्स्प्रेस, झेलम एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, हावडा एक्स्प्रेस, अमृतसर एक्स्प्रेस, कुशीनगर एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस, सेवाग्राम एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस आदी सुपरफास्ट गाड्या सध्या सुरू आहेत. मात्र, या गाड्यांना जनरल तिकीट बंद ठेवण्यात आले आहे.
इन्फो :
रेल्वेचा स्पेशल प्रवास परवडेना
कोरोनामुळे रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या वर्षांपासून पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे सध्या ज्या स्पेशल व विशेष गाड्या सुरू आहेत, त्या गाड्यांनी प्रवास करावा लागत आहे. मात्र, या गाड्यांना तिकीट दर हा जास्त असल्याने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता अनलॉकनंतर पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.
संदीप पाटील, प्रवासी
कोरोनाचे कारण सांगून रेल्वे प्रशासनाने सर्वत्र अनलॉक झाल्यानंतरही पॅसेंजर बंद ठेवल्या आहेत. इतर गाड्या सुरू असताना पॅसेंजर गाड्या बंद का? रेल्वे प्रशासनाचे हे धोरण समजत नाही. यामुळे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून, याबाबत स्थानिक खासदार-आमदारांचेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे, तर सध्याच्या स्पेशल गाड्यांच्या नावाने जादा तिकीट आकारून रेल्वे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड देत आहे.
संजय येवले, प्रवासी
इन्फो :
तर राज्य शासनाच्या आदेशानंतर पॅसेंजर सुरू होणार
अनलॉकनंतरही पॅसेंजर गाड्या सुरू होत नसल्याबाबत `लोकमत` प्रतिनिधीने भुसावळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता, त्यांनी पॅसेंजर सुरू करण्याला राज्य शासनाची परवानगी नाही. राज्य शासन जेव्हा परवानगी देईल, तेव्हाच पॅसेंजर सेवा सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.