कुजबूज प्रादेशिककडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:24+5:302021-07-02T04:12:24+5:30
चाळीसगावला कन्नड घाटाच्या पायथ्याशी हजारो एकर जमिनीवर 'सोलर शेती' फुलविल्याने मनोहारी दृष्य दिसत आहे. घाटातील नागमोडी वळणावरून पायथ्याशी असणारे ...

कुजबूज प्रादेशिककडून
चाळीसगावला कन्नड घाटाच्या पायथ्याशी हजारो एकर जमिनीवर 'सोलर शेती' फुलविल्याने मनोहारी दृष्य दिसत आहे. घाटातील नागमोडी वळणावरून पायथ्याशी असणारे सोलर प्रकल्प कुणाचेही लक्ष वेधून घेते; मात्र या प्रकल्पांमुळे हजारो गरीब, अशिक्षित शेतकऱ्यांच्या जीवनात 'अंधार' दाटून आला आहे. सोलर प्रकल्पाने उजेडाचे दान दिलेही असेल; पण या प्रकल्पांमुळे बाधित झालेल्यांचा आक्रोश येथे अधून- मधून उमटत असतो. बनावट खरेदी खत, इको सेंसीटीव झोनमध्ये हे प्रकल्प उभारले गेले आहे, असे म्हणत येथे आंदोलनेही झालीत. विधिमंडळात असणाऱ्या राज्य कारभाऱ्यांच्या समोरदेखील हा प्रश्न मांडला गेला; मात्र प्रकल्पग्रस्तांना अजूनही न्याय मिळाला नाही. सोमवारी व मंगळवारी माजी वनमंत्री आमदार संजय राठोड हे दोन दिवस चाळीसगाव तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी भटक्या - विमुक्तांच्या म्हणजेच बंजारा समाजाच्या तांड्यांवर भेटी दिल्या. ते वनमंत्री असताना सोलर पीडितांनी त्यांनाही आपला आक्रोश ऐकवला होता. राठोड चाळीसगावात आल्याने सोलर पीडितांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. मध्यंतरी अनिल गोटे यांनीही सोलर पीडिताचा प्रश्न हाती घेतला होता. तथापि, कुठे माशी शिंकली, कुणास ठाऊक. गोटेही शांत झाल्याची बोच पीडित बोलून दाखवतात. आमदार संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकारांनी सोलर पीडित शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना बोलते केले. तुम्ही वनमंत्री असताना पीडित शेतकऱ्यांची बाजू घेतली नसल्याचा आक्षेप या पीडितांचा आहे. ही बाजू समोर ठेवली. यावर राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे सत्र आपणच लावल्याचे सांगितले. एवढेच नाही तर येत्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा म्हणून सोलर अन्यायग्रस्तांचा प्रश्न मांडून एसआयटीच नव्हे तर सीबीआय चौकशी करण्याची मागणी करू, असे उत्तर दिल्याने सोलरबाधितांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. दरम्यान, राठोड यांनी हे प्रकल्प खान्देशातील बलाढ्य लोकप्रतिनिधींमुळेच येथे थाटल्याचे पत्रपरिषदेत सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावणे साहजिकच आहे. आता हे बलाढ्य लोकप्रतिनिधी कोण? अशी कुजबूज परिसरात सुरू झाली आहे. सोलर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना मात्र राठोड यांच्या दौऱ्यानंतर आशेचा उजेड दिसू लागला आहे. अर्थात विधिमंडळाच्या अधिवेशनाचे घोडा-मैदान जवळच आहे. काय होते ते पाहू या, अशीही चर्चा येथे सुरू आहे.
- जिजाबराव वाघ