मुलगा घराबाहेर बसला असताना, पित्याने बाथरूममध्ये घेतला गळफास
By विलास.बारी | Updated: June 16, 2023 18:57 IST2023-06-16T18:57:10+5:302023-06-16T18:57:41+5:30
पत्नीने बाथरूमचा दरवाजा उघडताच दिसला पतीचा मृतदेह : समता नगरातील प्रौढाची आत्महत्या.

मुलगा घराबाहेर बसला असताना, पित्याने बाथरूममध्ये घेतला गळफास
जळगाव : समता नगरात एका घरात मुलगा बाहेर ओट्यावर बसला असताना, पित्याने घरातील बाथरूममध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी रामकृष्ण निकम (वय. ५८, रा. समता नगर) असे मृत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.
शिवाजी निकम हे शहरातील समता नगरात पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. सेंट्रिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास पत्नी ज्योती निकम या कामावर निघून गेल्या. दुपारी शिवाजी निकम हे मुलगा राजेंद्र सोबत घरी होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास मुलगा हा घराबाहेर बसलेला असताना शिवाजी निकम यांनी राहत्या घरातील बाथरूममध्ये दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी साडेतीन वाजता पत्नी ज्योती निकम या कामावरून घरी आल्या. त्यानंतर काही वेळात त्यांनी बाथरूमचा अर्धवट बंद असलेला दरवाजा उघडल्यानंतर समोर पतीचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला.
हे पाहताच त्यांनी आक्रोश केला होता. शेजारी राहणाऱ्या तरुणांनी मृतदेह खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नसून, याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोलिस नाईक कालसिंग बारेला व अजिज शहा करीत आहे.