कंदिलाच्या मंद प्रकाशात अभ्यास करताना गुरुजनांचे दीपस्तंभ लाभल्याने कुलगुरू झालो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:19 IST2021-09-05T04:19:50+5:302021-09-05T04:19:50+5:30
रावेर : कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात प्राथमिक ते विद्यापीठीय शिक्षणात गुुरुजनांचे अनेक दीपस्तंभ लाभले. यामुळेच कुलगुरू पदापर्यंत पोहोचलो, अशी विनम्र ...

कंदिलाच्या मंद प्रकाशात अभ्यास करताना गुरुजनांचे दीपस्तंभ लाभल्याने कुलगुरू झालो
रावेर : कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात प्राथमिक ते विद्यापीठीय शिक्षणात गुुरुजनांचे अनेक दीपस्तंभ लाभले. यामुळेच कुलगुरू पदापर्यंत पोहोचलो, अशी विनम्र भावना जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रा. राघव शिवराम माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. शिक्षक दिनानिमित्त आपण गुरुजनांमुळे कसे घडलो? यासंबंधी महती विषद करताना ते बोलत होते.
कुलगुरू पदावर हलाखीच्या परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना व तरुण प्राध्यापकांना मदतीचा हात देऊन शिक्षण व संशोधनाच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचे अहोभाग्य मिळाले, तर आताही थेट आताच्या नॅक समितीवर गुणात्मक दर्जाचे शिक्षण पध्दत व संशोधन टिकवण्यासाठी मिळालेली आयुष्याची संधी जीवन सुखावणारी असल्याचे समाधानही डॉ. प्रा. माळी यांनी व्यक्त केले.
रावेर तालुक्यातील वाघोड हे त्यांचे मूळ गाव. त्यामुळे आपल्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक व विद्यापीठीय या साऱ्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. माळी सांगतात की, वाघोड गावी शिक्षणाचे चांगले वातावरण नव्हते. इयत्ता सातवीपर्यंत शाळा होती. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशात अभ्यास करायला लागायचा. त्यात रात्री बैलांना चारा टाकण्यासाठी ‘कोणता मोठा साहेब होणार आहेस तू?’ असे म्हणून हिणवत कंदील घेऊन पळणाऱ्या थोरल्या भावाशी संघर्ष करून अभ्यास करायचो. इयत्ता ७ वीच्या व्हर्नाक्युलर फायनल परीक्षेत २५ विद्यार्थ्यांमध्ये ६ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन त्यातही मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो म्हणून गावातील शंकर रामचंद्र चौधरी, राघो शामा महाजन, शंकर खुशाल महाजन ही समाजधुरीण मंडळी शिक्षणासाठी प्रोत्साहन देत होती.
तद्नंतर माध्यमिक शिक्षण रावेरला दररोज पायी ये-जा करून सरदार जी.जी. हायस्कूलमघ्ये घेतले. इयत्ता १०वीत असताना भालोद येथील चित्रकला स्पर्धा परीक्षेत पहिला आल्याने चित्रकला शिक्षक होण्याची मनाशी गाठ बांधली. किंबहुना, इयत्ता ११वीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने चित्रकला शिक्षक न होता महाविद्यालयात पुढील शिक्षण घेण्यासाठी शिक्षकांनी प्रवृत्त केले.
वाघोड येथील शंकर रामचंद्र चौधरी हे जिल्हा शालेय महामंडळाचे सदस्य असल्याने त्यांनी जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात तत्कालीन प्राचार्य भाईसाहेब वाय. एस. महाजन यांची भेट घेऊन प्रवेश मिळवून दिला. दरम्यान, एम. जे. कॉलेजमध्ये प्रा. एम. डी. नाडकर्णी यांचे चांगले सहकार्य त्यांना लाभले. बी. एस्सी. उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पदव्युत्तर शिक्षण घेणे नसल्याने माध्यमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी अर्ज केले. मात्र, नाडकर्णी सरांना ते मान्य नव्हते. त्यांनी महाविद्यालयात व विद्यापीठात शिक्षण संशोधन करण्यासाठी प्रवृत्त केले. नव्हे तर त्यांनी महाविद्यालय व्यवस्थापनाशी चर्चा करून सन १९६६ - ६७ मध्ये मु. जे. त निदर्शक म्हणून नियुक्ती मिळवून दिली.