ज्याच्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात तो गुरुच होय - सुकन्या पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 13:21 IST2019-07-16T13:20:12+5:302019-07-16T13:21:31+5:30
प्रत्येक जण काहीना काही शिकवृून जात असतो, स्वत:ची क्षमता ओळखून सक्षम बना

ज्याच्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडतात तो गुरुच होय - सुकन्या पाटील
जळगाव : जीवनात प्रत्येक जण काहीतरी शिकवून जातो,ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात, अशा भावना मुळच्या जळगावातील हरेश्वरनगरातील रहिवासी व आयआयटी पवईच्या सुवर्णपदक विजेत्या आणि‘वर्ल्ड क्वान्ट’या बहुराष्ट्रीय कंपनीच्या उपाध्यक्षा सुकन्या विजयसिंग पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
गुरूपौर्णिमेच्या निमित्त गुरूचे जिवनातील महत्व या विषयावर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या भावना व्यक्त केल्या.
त्या म्हणाल्या की, ‘ जळगाव शहरात एक सामान्य कुटुंबात वाढले. शाळेत शिकायला जाण्यापूर्वी मला आकार देणारी माझी आई माझी पहिली गुरूच होय. आयआयटी प्रवेश करू शकले याचे मूळ कारण म्हणजे शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा देत राहिली, आणि याचा पाया रचला तो चौथी स्कॉलरशिपने. आयआयटी म्हटले म्हणजे गणित आणि विज्ञान आलेच. मी शाळेत असताना े गणित शिक्षकांनी गणिताची भीती घालवली. यातून यशाचा पल्ला गाठण्याची नवीन उर्मी मिळाली, असल्याचे सुकन्या पाटील यांनी सांगितले.
‘आयआयटी प्रवेशाच्या तयारीसाठी पुण्याला जाणे हा जीवनाचा टर्निंग पॉईंट बनला. तिथे माझ्या क्षमता वाढविणारे आणि मला सक्षम करणारे गुरू भेटले. आयआयटी प्रवेशाची कवाडे स्वत:च्या ज्ञानाने कशी उघडायची हे मी तिथं शिकले. आयआयटी प्रवेशाची जेईई परीक्षा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण झाले. देशातील अव्वल आयआयटी म्हणजे आयआयटी पवई येथे निवड झाली. एवढ्या मोठ्या संस्थेत देशभरातून आलेल्या बुद्धिमान मुलामुलींमध्ये शिकणे मला आधी कठीण वाटत होते. पण आईचे संस्कार आणि जिद्दीची शिकवण यामुळे मी तिथे टिकू शकली. ज्याच्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडतात ते सर्व आपले गुरु असतात.