व्हेंटिलेटरच्या अहवालात दडलंय काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST2021-08-18T04:23:12+5:302021-08-18T04:23:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून खरेदी झालेल्या ३० व्हेंटिलेटरच्या गैरव्यवहार प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यानंतरही अहवालात वारंवार चौकशी ...

व्हेंटिलेटरच्या अहवालात दडलंय काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून खरेदी झालेल्या ३० व्हेंटिलेटरच्या गैरव्यवहार प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यानंतरही अहवालात वारंवार चौकशी समितीला वरिष्ठांकडून बदल सांगितले जात असल्याने आता यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर करण्यात आला आहे. मात्र, अद्याप हा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना सुपुर्द करण्यात आलेला नाही. मात्र, ही चौकशीच आपल्याला मान्य नसून आपल्याला डावलले जात आहे. त्यामुळे आपण थेट न्यायालयात जाणार असल्याचा इशारा तक्रारदार दिनेश भोळे यांनी दिला आहे.
व्हेंटिलेटर घोटाळ्यात ज्या कंपनीचे व्हेंटिलेटर हवे त्यापेक्षा वेगळ्याच कंपनीचे व्हेंटिलेटर दिले गेल्याने यात ३ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत दिनेश भोळे यांनी तक्रारी करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार चौकशी समितीने चौकशी केली. मात्र, तक्रारदारांनी अहवालास होणारा विलंब व आपल्याला काहीएक कळविले जात नसल्याने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, जनतेच्या पैशांची कोविडच्या काळात लूट झालेली असून, जनतेने या लढ्यात आपल्याला साथ द्यावी, असे आवाहनही दिनेश भोळे यांनी केले आहे.
कॉन्स्ट्रेटरबाबत तक्रार
बाजारात २५ ते ३० हजारांत मिळणारे कॉन्स्ट्रेटर हे जिल्हा रुग्णालयाने सव्वा लाखांना खरेदी केले असून, यात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
अधिकाऱ्यांना पत्र
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी भांडारपाल मिलिंद काळे यांना व्हेंटिलेटर का स्वीकारले याबाबत पत्र देऊन खुलासा मागविल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.