व्हेंटिलेटरचे झाले, कॉन्सन्ट्रेटरचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:19 IST2021-08-22T04:19:54+5:302021-08-22T04:19:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून कोरोना काळात विविध माध्यमातून झालेल्या खरेदीप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यातील ११० ...

व्हेंटिलेटरचे झाले, कॉन्सन्ट्रेटरचे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा रुग्णालयाकडून कोरोना काळात विविध माध्यमातून झालेल्या खरेदीप्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. यातील ११० कॉन्सन्ट्रेटरच्या तक्रारीबाबत अद्यापही प्रशासनाकडून कुठलीही ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही. शिवाय हे कॉन्सन्ट्रेटर प्रात्यक्षिकांअभावी ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून पडून असल्याचे समोर येत आहे. बाजारातील किंमतीपेक्षा दोन ते अडीच पटीने अधिक किमतीने हे कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात आले आहेत.
जिल्हा रुग्णालयाने कोविडच्या काळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून खासदार निधीतून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची खरेदीप्रक्रिया राबविली होती. मात्र, यात बाजारात कुठलाही सर्व्हे न करता सरसकट प्रभंजन ऑटोमोबाइल या पुरवठादारांनी जे दर निविदेत भरले तेच दर मान्य करून पुरवठा आदेश देऊन या मशीनही स्वीकारण्यात आलेल्या असल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. हे दर बाजारभावापेक्षा दुपटीने अधिक आहेत. यातही जे मॉडेल नोंदविले त्यापेक्षा वेगळे मॉडेल देण्यात आले आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेटर खरेदी प्रक्रियेप्रमाणेच यातही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे यांनी केला आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.
३५ हजारांत कॉन्सन्ट्रेटर
एका लोकप्रतिनिधींनी याबाबत माहिती देताना आपण नुकतेच ३५ हजारांत आपल्या गावासाठी एक चांगल्या गुणवत्तेचे कॉन्सन्ट्रेटर घेतल्याची माहिती दिली होती. दुसरीकडे प्रभंजनकडून देण्यात आलेले मॉडेल हे चायनीज मॉडेल असून, त्या मॉडेलच्या वापराबाबत आधीच प्रश्नचिन्ह आहे. असे असतानाही एवढ्या महागड्या किंमतीत हे कॉन्सन्ट्रेटर कसे स्वीकारण्यात आले, असा प्रश्न दिनेश भोळे यांनी उपस्थित केला आहे.
अशी झाली प्रक्रिया
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरबाबत २२ जून रोजी प्रशासकीय मान्यता पुरवठा आदेश देण्यात आले होते.
१८ जून रोजी जीईएम पोर्टलवरील कॉन्ट्रॅक्ट मंजूर करण्यात आला.
१ जुलै रोजी व्हेंटिलेटर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
तोच आरोप तेच स्पष्टीकरण
कॉन्सन्ट्रेटर प्रकरणातही व्हेंटिलेटरप्रमाणेच जीईएम पोर्टलवर वेगळे मॉडेल नोंदविण्यात आले आहे व त्यापेक्षा वेगळे मॉडेल प्रत्यक्षात ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले आहेत. मात्र, या कॉन्सन्ट्रेटरचे स्पेसिफिकेशन मागणीपेक्षा अधिक असल्याचा खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिला आहे.