कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST2021-07-02T04:12:17+5:302021-07-02T04:12:17+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोलिसांकडून कारवाई जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशाची पायमल्ली ...

What is Article 188? | कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ?

कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात पोलिसांकडून कारवाई

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १९८७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊन काळात कलम १८८ अन्वये ३२१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. याच काळात नियमांचे उल्लंघन केले म्हणून ११६२ वाहनेही जप्त करण्यात आलेली आहेत. दाखल गुन्ह्यांची प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आलेली आहेत.

राज्यात १४ मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला असून, खंड २,३ व ४ मधील तरतुदीनुसार त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या काळात विनामास्क फिरणाऱ्या ४२ हजार जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यांच्याकडून १ कोटी ९ लाख ३४ हजार १०५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, कारण नसताना रस्त्यावर फिरणे, तोंडाला मास्क किंवा रुमाल न लावणे या साधारण नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे. नागरिकांनी स्वत:च्या व जनतेच्या सुरक्षेसाठी बाहेर न फिरता घरातच राहणे अपेक्षित असून, त्याबाबत वारंवार सूचना व आवाहन करूनही त्यात फारसा फरक न पडल्याने आता पोलिसांनी थेट कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करून वाहने जप्त करण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यात दाखल गुन्हे : ३२१

वाहन जप्त : ११६२

दंड वसुली (विनामास्क) : १,०९,३४,१०५

काय आहे कलम १८८

एखाद्या आजाराची साथ पसरली असेल व ती ससंर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून अनेक व्यक्ती बाधित होऊ शकतात, अशा वेळी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ व भादंवि कलम १८८ हा कायदा लागू होतो. भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८८, राष्टीय व्यवस्थापन कायदा -२००५ मधील कलम ५१ ते ६० फौजदारी दंड संहिता १९७३ मधील तरतुदीनुसार शिक्षा होऊ शकते. गुन्हा अदखलपात्र व जामीनपात्र आहे. यात अटकेची गरज नाही, न्यायालयात प्रकरण पाठविले जाते.

तीन ते पाच हजार दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

कोरोना विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे . शासनाच्या आदेशाने पालन न करणाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम १८८ ,राष्टीय व्यवस्थापन कायदा -२००५ व भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ कलमान्वये गुन्हे दाखल केले जातात. यात तीन ते पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. अशाच प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने आदेशाचे उल्लंघन करणार्‍या १३ जणांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला आहे.

कोट..

स्वत:च्या व जनतेच्या हितासाठी नागरिकांनी नियम पाळून घरातच थांबणे अपेक्षित होते व आहे. पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरले. आरोग्य यंत्रणा त्यांच्या पातळीवर कार्य करते आहे. लोकांच्याच हितासाठी लॉकडाऊन आहे. वारंवार सूचना व आदेश काढूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आतादेखील निर्बंध लागू असून, नागरिकांनी कारवाईची वेळ येऊ न देता आदेशाचे पालन करावे हीच अपेक्षा आहे.

- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक

Web Title: What is Article 188?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.