जळगावात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; डीजे, संगीत पथकाने वेधले लक्ष, तरुणाई बेधुंद
By विलास बारी | Updated: January 1, 2024 00:18 IST2024-01-01T00:17:48+5:302024-01-01T00:18:18+5:30
प्रत्येकाच्या जीवनातील अनेक घडामोडींसह हे वर्षदेखील पाहता-पाहता सरले, असे म्हणत संध्याकाळी शहरवासीय नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडू लागले.

जळगावात नववर्षाचे जल्लोषात स्वागत; डीजे, संगीत पथकाने वेधले लक्ष, तरुणाई बेधुंद
विलास बारी
जळगाव : खास मुंबईहून आलेले संगीत पथक, महिलांचे डीजे पथक व त्यासोबतच स्थानिक संगीत, वाद्याच्या तालावर बेभान होत तरुणाईच्यावतीने २०२३ या सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फटाके फोडण्यात येऊन हॉटेलमध्ये रॉक बॅण्ड व कपल डान्सने आनंद द्विगुणित झाला होता. गुडबाय २०२३, वेलकम २०२४ असा असा जल्लोष करणाऱ्या तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता.
प्रत्येकाच्या जीवनातील अनेक घडामोडींसह हे वर्षदेखील पाहता-पाहता सरले, असे म्हणत संध्याकाळी शहरवासीय नववर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडू लागले. यामध्ये अनेकांनी हॉटेलिंगला पसंती दिली तर काही जणांनी घरीच भरीत, शेवभाजीचा बेत आखला होता. कॉलनी भागांमध्ये गच्चीवरही पार्ट्या रंगल्या. त्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येला ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर बार, रेस्टॉरंट यांना विशेष सवलत दिली होती. त्यामुळे हॉटेलवरदेखील आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने त्या उजळून निघाल्या होत्या. रात्री आठ वाजेपासून अनेकजण मित्रांसह हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्या ठिकाणी संगीत, नृत्यावर ठेका धरत तरुणाई बेधुंद झाली होती. कुटुंबीयांचा हॉटेलिंगला पसंती दिल्यामुळे सर्वच हॉटेल्स फुल्ल झाल्या होत्या.
बोचरी थंडी आणि संगीत, मंद प्रकाशात जल्लोष
ग्राहकांच्या स्वागतासह वातावरणात रंगत आणण्यासाठी हॉटेल्सवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. बोचरी थंडी व संगीत, मंद प्रकाश अशा वातावरणात अनेकांनी हॉटेलिंगचा आनंद घेतला. एरव्ही रात्री १० वाजेनंतर रस्त्यांवरील वर्दळ कमी होते; परंतु रविवारी रात्री उशिरापर्यंतही वाहनधारक, पादचाऱ्यांची सारखी वर्दळ रस्त्यांवर होती. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, नेरी नाका, अजिंठा चौक यासह ठिकठिकाणी पोलिस तैनात होते.
मुंबईचे डीजे पथक खास आकर्षण
यंदा थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जळगावकरांसाठी खास मुंबई येथील महिलाचे डीजे पथक आणले होते. डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद होऊन नृत्य करीत होती. विशेष म्हणजे महिलांसाठी येथे खास व्यवस्था होती. शिवाय अनेकांनी जोडीने येत ‘कपल’ डान्सचा आनंद घेतला. दुसऱ्या एका हॉटेलमध्ये मुंबई येथूनच आणलेल्या संगीत पथकाने जळगावकरांना चांगलेच थिरकवले.