मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये आले तर स्वागतच! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By विलास बारी | Updated: June 30, 2024 23:40 IST2024-06-30T23:40:33+5:302024-06-30T23:40:54+5:30
अनिल पाटील म्हणतात या केवळ अफवा

मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये आले तर स्वागतच! - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गुरुवारी झालेल्या जिल्हा मेळाव्यात माजीमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अजित पवार गटाचे जिल्ह्यातील मंत्री अनिल पाटील हे लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता, फडणवीसांनीही अनिल पाटील भाजपमध्ये आले तर त्यांचे स्वागतच होईल, असे उत्तर दिले आहे.
रविवारी धरणगाव येथे आयोजित एका लग्न समारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी फडणवीसांनी सांगितले की, ज्या प्रकारे भारतीय संघाने विश्वचषक जिंकला, त्याचप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुकीची मॅचदेखील महायुती जिंकणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत आ. सुरेश भोळे उपस्थित होते. दरम्यान, मंत्री अनिल पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशाच्या केवळ अफवा असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे.