एकनाथ लोहार
पातोंडा (ता. अमळनेर) : पातोंडा येथे देवदेवतांच्या नावाने आठवडा बाजार भरण्याची जुनी पारंपरिक पद्धत आजही रुढीप्रमाणे सुरू आहे. सोमवारचा बाजार दत्तमंदिर चौकात भरणार आहे.
पातोंडा येथे दर सोमवारी आठवडा बाजार भरत असतो. पूर्वी आठवडा बाजार करण्यासाठी जवळच्या दहा-बारा खेडेगावातील लोकं यायची. आता प्रत्येक गावात सोयीनुसार आठवडा बाजार भरविला जात आहे. परिसरातील सर्वांत मोठा आठवडा बाजार दर सोमवारी भरत असतो.
श्रावणादी महिन्यात देवदेवतांच्या नावाने त्या त्या देवतांच्या चौकात आठवडा बाजार भरण्याची प्रथा जुन्या बुजुर्ग भाविकभक्तांनी सुरू केल्याचे समजते. त्यांनी घालून दिलेली प्रथा सर्व भाजीपाला विक्रेते, तसेच व्यावसायिक व ग्रामस्थांनी आजही कायम ठेवली आहे. येथे पुरातन महादेव मंदिर आहे. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ‘महादेव’ देवाच्या नावाने महादेव मंदिर चौकात आठवडा बाजार भरतो.
या दिवशी महादेव मंदिरात सत्यनारायणाची पूजा व महाप्रसाद असतो. चौथ्या किंवा गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या सोमवारी ‘श्रीगणपती’चा श्रीदत्त मंदिर, श्री दक्षिण हनुमान मंदिर व गणपती मंदिर या त्रिवेणी संगम चौकात आठवडा बाजार भरतो. सोमवारचा बाजार याच चौकात भरतो. येथील वरचपुरा माँ सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. चैत्र महिन्यात देवी यात्रोत्सवादरम्यान येणाऱ्या सोमवारी ‘सप्तशृंगी’ देवीचा नावाने आठवडा बाजार भरतो. अशाप्रकारे देवदेवतांच्या नावाने आठवडा बाजार भरण्याची रुढीगत परंपरा आजही जोपासली जात आहे.