सर्व कामे पूर्ण करू, मात्र निधी आणणार कोठून ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST2021-02-23T04:24:49+5:302021-02-23T04:24:49+5:30

गिरीश महाजन यांचे पुन्हा वर्षभराचे आश्वासन : भाजपच्या अडीच वर्षात कामांचीच प्रतीक्षा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील सुप्रीम ...

We will complete all the work, but where will the funds come from? | सर्व कामे पूर्ण करू, मात्र निधी आणणार कोठून ?

सर्व कामे पूर्ण करू, मात्र निधी आणणार कोठून ?

गिरीश महाजन यांचे पुन्हा वर्षभराचे आश्वासन : भाजपच्या अडीच वर्षात कामांचीच प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील सुप्रीम कॉलनी भागात अमृत योजनेतंर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या शुभारंभप्रसंगी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शहरातील सर्व कामे पूर्ण करू, तसेच अमृत योजना संपल्यानंतर वर्षभरात शहरातील रस्त्यांसह इतर कामे पूर्ण करण्याचे आश्वासन आपल्या भाषणाव्दारे दिले. मात्र, ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी निधीची गरज असते. तो निधी आणणार तरी कोठून असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मनपा निवडणुकीच्या वेळेस माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावकरांना वर्षभरात विकास करण्याचे आश्वासन जळगावकर अजूनही विसरलेले नाहीत. आज महापलिकेत सत्ता येऊन भाजपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. मात्र, या अडीच वर्षात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा भ्रमनिरासच करण्यात आले आहे. शहरातील रस्ते, स्वच्छता, आरोग्य अशा समस्यांवर सत्ताधाऱ्यांना तोडगा काढता आलेला नाही. जळगाव शहर आता धुळगाव म्हणून ओळखले जाऊ लागले असून, गिरीश महाजनांनी शनिवारच्या कार्यक्रमात धुळगाव होत असल्याचेही मान्य केले. तसेच शहरातील रस्त्यांची कामे अमृतमुळे थांबले असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मनपा निवडणुकीत आश्वासन देत असतानाही अमृतचे काम हे अडीच वर्ष सुरूच राहणार होते. मात्र, त्यावेळी आश्वासन देताना अमृतच्या कामांचा विचार माजी मंत्र्यांनी केला नाही.

आता कामे पूर्ण करणार कशी?

१. शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करू असे आश्वासन महाजनांनी पुन्हा दिले आहे. मात्र, ही कामे करत असताना आता निधी आणणार ती कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राज्यात आता भाजपची सत्ता नसल्याने निधी मिळणे कठीण आहे. त्यातच भाजपच्या सत्तेदरम्यान मिळालेल्या निधीवरील स्थगिती अजून उठलेली नाही.

२. जर राज्य शासनाकडून निधीच मिळाला नाही. तर शहरातील कामे कशी होतील? असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. त्यातच सत्ताधाऱ्यांनी शहरातील रस्त्यांची कामे घेतली आहे. मात्र, ती ही मनपा फंडातून, मनपाची परिस्थिती बेताची असताना मनपा फंडातून एवढ्या निधीची कामे करणे म्हणजेच, मुंगीने एव्हरेस्ट सर करण्यासारखेच आहे.

३. त्यातच गाळेधारकांचा विषयदेखील सत्ताधाऱ्यांनी प्रलंबित ठेवला आहे. कारण मनपाची आर्थिक परिस्थिती ही गाळे प्रश्न मार्गी लागण्यानंतर सुधारू शकते, हे प्रशासनाला माहिती आहे. मात्र, हाच विषय केवळ मतांच्या राजकारणासाठी प्रलंबित ठेवला जात आहे. तर गाळेधारकांचा विषय मार्गी लागू शकत नाही. तर मनपा फंडातून होणाऱ्या कामांसाठी निधी मिळेल तरी कोठून? त्यामुळे महाजनांनी पुन्हा दिलेल्या आश्वासनाला जळगावकर किती सिरीयसली घेतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: We will complete all the work, but where will the funds come from?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.