वॉटरग्रेस कंपनीला पाच हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST2020-12-26T04:13:22+5:302020-12-26T04:13:22+5:30
साफसफाईच्या ठेक्यात साई मार्केटिंगसोबत करारनामा केलेल्या वॉटरग्रेस कंपनीने वजन वाढविण्यासाठी कचऱ्याऐवजी माती भरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य ...

वॉटरग्रेस कंपनीला पाच हजारांचा दंड
साफसफाईच्या ठेक्यात साई मार्केटिंगसोबत करारनामा केलेल्या वॉटरग्रेस कंपनीने वजन वाढविण्यासाठी कचऱ्याऐवजी माती भरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मक्तेदाराला पाच हजारांचा दंड केला आहे. तसेच वारंवार असे झाल्यास कारवाईची नोटीस बजावली आहे. बुधवारी सकाळी पालिकेच्या सभापती रंजना सपकाळे यांचे पती भारत कोळी यांनी मक्तेदाराच्या वाहनात माती भरली जात असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून अहवाल दिला होता. त्या अहवालानुसार मक्तेदाराला दंड करण्यात आला आहे.
वेतनाअभावी सफाई कर्मचाऱ्यांचे पुन्हा कामबंद,
एकीकडे उपठेक्याच्या कारणावरून वॉटरग्रेस चर्चेत असताना आता वॉटरग्रेस कंपनीने सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन थांबल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी कामबंद केल्याची माहिती समोर आली आहे. अनेक कर्मचारी कामावर जात नसून, वेतनाचा तिढा सुटण्याची मागणी सफाई कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. अनेक भागात घंटागाडी जात नसून, शहरातील अनेक भागांमधील कचरा देखील उचलला जात नसल्याने शहरात ‘कचराकोंडी’ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.